आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘पेट’चे दोन्ही टप्पे व ‘आरआरसी’ मुलाखतीचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात १७९ उमेदवार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी पात्र ठरले. परंतु चार महिने उलटून गेल्यानंतरदेखील या उमेदवारांना नोंदणीपत्र मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे संशोधन सुरू होऊ शकलेले नाही. ‘कोरोना’मुळे हा विलंब झाला असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.
नियमानुसार नोंदणीपत्र मिळाल्यानंतरच उमेदवार प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात करू शकतात. ‘आरआरसी’चा निर्णय आल्यानंतर उमेदवार वारंवार प्रमाणपत्रासाठी परीक्षा विभागाशी संपर्क करत आहेत. मात्र त्यांना अद्यापही प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. यासंबंधात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एस. आर. चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘कोरोना’मुळे विलंब झाल्याचे सांगितले. मागील चार महिन्यांपासून परीक्षा विभागातील बहुतांश कर्मचारी मनपा व जिल्हा प्रशासनाच्या सेवेत आहेत. कर्मचारी नसल्याने प्रमाणपत्र तयार होऊ शकलेले नाहीत. प्रत्यक्षात ‘आरआरसी’ने ‘लॉकडाऊन’ सुरू होण्याअगोदरच निर्णय जाहीर केले होते. मात्र परीक्षा विभागाने नोंदणीपत्र जारी करण्यात हलगर्जीपणा दाखविला. अधिसूचना २० मार्च रोजी संकेतस्थळावर आली होती. परीक्षा विभागाच्या बेजबाबदारपणाचा फटका उमेदवारांना बसतो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा विभागाकडून नोंदणीपत्र जारी करण्यात जाणूनबुजून उशीर करण्यात आला आहे.
प्र-कुलगुरूंच्या कार्यालयात पडल्या आहेत फाईल्सउमेदवारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याशी संबंधित फाईल्स प्र-कुलगुरूंच्या कार्यालयात पडल्या आहेत. त्यावर त्यांची स्वाक्षरी झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांना प्रमाणपत्र मिळू शकलेले नाहीत. हे प्रमाणपत्र जारी करायला केवळ एकाच कर्मचाऱ्याची आवश्यकता होती व ते फेब्रुवारी महिन्यातच तयार होते. ‘लॉकडाऊन’नंतरदेखील परीक्षा विभागात कर्मचारी येत होते. सुटीच्या दिवशीदेखील काही अधिसूचना जारी करण्यात आल्या. काही अधिसूचना तर पीएचडी सेलच्या उपकुलसचिवांच्या स्वाक्षरीविनाच जारी करण्यात आल्या.