लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहात आर्थिक घोटाळ्यानंतर आता चक्क ‘पलंग’ घोटाळा उघडकीस आला आहे. माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाके यांच्या कार्यकाळात पलंग, खुर्ची आणि टेबलच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाला आढळून आले असून याचीदेखील चौकशी सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षा ठेवेच्या १६ लाखांहून अधिक निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अगोदरच शेडमाके यांची चौकशी सुरू आहे.प्रकाश शेडमाके हे जवळपास तीन वर्ष विद्यापीठाच्या वसतिगृहाचे ‘वॉर्डन’ होते. या कालावधीत त्यांनी वसतिगृहासाठी १८० पलंगांची ‘आॅर्डर’ दिली होती. यासंदर्भात निविदादेखील काढण्यात आली होती. प्रत्यक्षात वसतिगृहात ८० पलंगच आले. याचप्रमाणे १५० टेबलची ‘आॅर्डर’ देण्यात आली व त्यापैकी ५० ‘टेबल’ वसतिगृहात आले. तर खुर्च्यांच्या बाबतीतदेखील अशीच स्थिती होती. शेडमाके यांनी ‘मेस डिपॉझिट’च्या शुल्काबाबत केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. तीच समिती या घोटाळ््याचीदेखील चौकशी करेल, अशी माहिती डॉ.काणे यांनी दिली.हा होता शेडमाकेंनी केलेला पहिला गैरव्यवहारनागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांकडून ‘मेस डिपॉझिट’च्या नावाखाली प्रत्येकी दोन हजार रुपये घेण्यात येतात. हे शुल्क एका विशिष्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते व त्या खात्यातून पैसे काढण्याचे कुठलेही अधिकार ‘वॉर्डन’कडे नसतात. विद्यापीठाचे माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाके यांनी या बँक खात्यातून परस्पर खात्याच्या ‘सेल्फ चेक’च्या माध्यमातून ही रक्कम काढली. नवे ‘वॉर्डन’ डॉ.शामराव कोरेटी यांच्या निदर्शनास ही बाब आली व त्यांनी त्याबाबत लगेच प्रशासनाला माहिती दिली.चौकशी समितीसमोर शेडमाके गैरहजरचौकशी समितीसमोर प्रकाश शेडमाके केवळ एकदाच आल्याचे कुलगुरूंनी सांगितले. सुरुवातीला त्यांनी माझे चेकबुक हरविले यासारखी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दुसऱ्या वेळी आपली बाजू लेखी मांडण्याची त्यांना संधी देण्यात आली. मात्र त्याला ते आलेच नाही. आता आणखी एकदा त्यांना बोलाविण्यात येईल. जर ते आले नाही तर त्यांना काही सांगायचे नाही, असा निष्कर्ष काढून समिती अहवाल सादर करेल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
नागपूर विद्यापीठ : वसतिगृहात चक्क ‘पलंग’ घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:18 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहात आर्थिक घोटाळ्यानंतर आता चक्क ‘पलंग’ घोटाळा उघडकीस आला आहे.
ठळक मुद्देमाजी ‘वॉर्डन’चा प्रताप