लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे अखेर ‘नॅक’ला स्वयंअध्यन अहवाल (एसएसआर) पाठविण्यात आला आहे. संबंधित अहवाल हा मागील वर्षीच पाठविणे अभिप्रेत होते. मात्र ‘नॅक’ने ऐनवेळी निकषांमध्ये बदल केल्याने विद्यापीठाला नव्याने अहवाल तयार करावा लागला. सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा आहेत. अशा स्थितीत ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी मिळविण्याचे आव्हानच प्रशासनासमोर आहे. विद्यापीठाचे हे चौथे मूल्यांकन राहणार आहे.
नागपूर विद्यापीठाला डिसेंबर २०१९ पर्यंत 'नॅक'चा 'अ श्रेणी' दर्जा मिळाला होता. त्यापूर्वी नव्या मूल्यांकनासाठी 'नॅक'ला प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते. प्रशासकीय हलगर्जीपणामुळे डिसेंबर २०१९ पर्यंत अहवाल तयार झाला नव्हता. त्यातच वर्षाअखेरीस ‘नॅक’ने नवीन निकष जारी केले. अनेक मुद्द्यांचे ‘ऑनलाईन’ पुरावे जोडणे आवश्यक झाले. त्यामुळे अहवाल जवळपास तयार झाला असतानादेखील तो विद्यापीठाला पाठविता आला नाही. त्यानंतर नव्याने अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मध्यंतरीच्या कालावधीत डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ संपला व डॉ.सुभाष चौधरी कुलगुरूपदी आले. यात अहवालाचे काम मागे पडले. मात्र मागील काही आठवड्यांपासून युद्धस्तरावर हे काम करण्यात आले.
अखेर गुरुवारी विद्यापीठाने स्वयंअध्ययन अहवाल ‘नॅक’ला पाठविला. ‘आयक्यूएसी’च्या संचालक डॉ. स्मिता आचार्य, माजी संचालक डॉ.स्मिता देशपांडे, डॉ.संजय कविश्वर, डॉ.समीर सिद्दीकी, डॉ.धीरज कदम यांच्या चमूने हा अहवाल तयार केला.
स्वयंअध्ययन अहवालाला महत्त्व
मागील पाच वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर स्वयंअध्ययन अहवाल तयार करण्यात आला आहे. शैक्षणिक मापदंड, संशोधन, प्रशासन, विद्यार्थ्यांचा सहभाग इत्यादी मुद्द्यांवर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ‘नॅक’तर्फे संबंधित माहितीची पडताळणी होईल व त्यानंतर विद्यार्थ्यांकडून स्वयं संतुष्टी अहवाल भरुन घेण्यात येईल. त्यानंतर ''''नॅक''''ची चमू विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट देण्याची शक्यता आहे. ''''नॅक''''च्या नव्या निकषानुसार स्वयंअध्ययन अहवालाला ६० टक्के, तर ''''नॅक''''च्या चमूकडून होणाऱ्या प्रत्यक्ष पाहणीला ४० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे स्वयंअध्ययन अहवाल हा नव्या अधिस्वीकृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.