लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालयांसाठी विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेणे अवघड जाणार आहे. शनिवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अ.भा. विद्यार्थी परिषदेला सोडून इतर संघटनांनी विरोध केला.बैठकीला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व एनएसयुआयच्या प्रतिनिधींनी बैठकीवर बहिष्कारही घातला. निवडणूक प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तकाची होळी केली. संघटनांच्या प्रतिनिधींनी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण संचालक (डीएसडब्ल्यू) डॉ. अभय मुदगल यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले. बैठकीदरम्यान प्रतिनिधींनी आरोप केला की, मुदगल यांची नियुक्ती अभाविपचा फायदा होईल या उद्देशाने केली आहे. बैठकीदरम्यान एनएसयुआयचे अजित सिंह म्हणाले की निवडणुकीच्या नावावर सरकार व विद्यापीठ विद्यार्थ्यांशी गंमत करीत आहे. देशभरातील विद्यापीठात होणाऱ्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीच्या धर्तीवर नागपूर विद्यापीठातही निवडणुका होणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी निवडणूक प्रक्रियेत त्रुटी असल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे आहे की, विद्यार्थी संघटनांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवणे हे लोकशाही प्रक्रियेचे उल्लंघन आहे. संघटनांनी यावेळी नारेबाजी करीत जोरदार हंगामा केला.विशेष म्हणजे राज्यातील कृषी विद्यापीठात १९९४ पासून नवीन विद्यापीठ अधिनियम लागू झाल्यानंतर खुल्या निवडणुका न घेता, मेरिटच्या आधारावर विद्यार्थी संघाचे गठन करण्याची प्रणाली अवलंबण्यात आली आहे. १९९६ मध्ये पहिल्यांदा नवीन प्रक्रियेंतर्गत निवडणुका झाल्या होत्या. विद्यापीठाशी जुळलेल्या संघटनांनी याला विरोध केला होता. सोबतच ओपन इलेक्शन घेण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या जागी महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट २०१६ लागू करण्यात आला. यात ओपन इलेक्शन घेण्याचे प्रावधान आहे. या कायद्यान्वये विद्यार्थी संघाच्या पहिल्यांदा निवडणुका होणार आहे. याची माहिती देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.