योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘जंक फूड’ची विक्री करू नये असे केंद्र व राज्य शासनाच्या पातळीहून निर्देश असतानादेखील त्यांना हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे ‘कॅन्टिन’ असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात येणार आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठातच यासंदर्भात आयोजन करणे सहज शक्य असताना चक्क एका ‘तारांकित’ हॉटेलमध्ये यावर मंथन होणार आहे. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर चर्चा होणार की ठराविक व्यक्तींचे ‘पोषण’ करण्यासाठी हे आयोजन आहे असा प्रश्न महाविद्यालयांतूनच उपस्थित होत आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या आरोग्याविषयक समस्या लक्षात घेता ‘जंक फूड’ला विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला. यानुसार विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना तसे निर्देश देणारे पत्र काढण्यात आले होते.दरम्यान, ३ मे २०१९ रोजी राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सर्व विभागीय कार्यालयांना पत्र पाठवून विशेष कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. ‘कॅन्टिन’मधील आहारात मार्गदर्शक तत्त्वांनुसार बदल करण्यासाठी जून ते नोव्हेंबर या कालावधीत कार्यक्रमच हाती घेण्यात आला. या वेळापत्रकानुसार डिसेंबर महिन्यात शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, ‘हेल्थ टीम’चे प्रमुख याची कार्यशाळा अन्न व औषध प्रशासनाच्या जिल्हा कार्यालयात घेण्याची सूचना करण्यात आली होती. यानुसार ४ डिसेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांनी कुलगुरुंना पत्र पाठविले व १४ डिसेंबर रोजी संबंधित कार्यशाळा वर्धा मार्गावरील एका तीन तारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आल्याचे कळविले. या कार्यशाळेला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा आयुक्तदेखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेला प्राचार्यांसह ‘फूड कमिटी अध्यक्ष’ व कॅन्टिनचालकदेखील उपस्थित राहणे अनिवार्य असल्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालकांनी सर्व संलग्नित महाविद्यालयांना यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. जिल्हा कार्यालयात ही कार्यशाळा आयोजित करणे शक्य नसल्याने विद्यापीठाच्याच दीक्षांत सभागृह किंवा गुरुनानक सभागृहात हे आयोजन करणे शक्य झाले असते. शिवाय एखाद्या संलग्नित महाविद्यालयातदेखील हे आयोजन करता आले असते. परंतु एखाद्या तारांकित हॉटेलमध्ये ही कार्यशाळा आयोजित करणे हे अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कुणाची ‘सोय’ महत्त्वाची ?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय विभागांकडून विद्यापीठाशी संबंधित काही आयोजन असले तर ते विद्यापीठ किंवा महाविद्यालयांच्या सभागृहातच होते. या आयोजनासंदर्भात मात्र विद्यापीठाला कुठलीही विचारणा झाली नाही. त्यामुळे कुणाच्या सोयीसाठी हे आयोजन ‘तारांकित’ हॉटेलमध्ये होत आहे हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.