लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एटीकेटी’च्या तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात येत आहेत. प्रवेशप्रक्रिया, नवीन ‘बॅच’साठी ‘ऑनलाईन कंटेट’ तयार करणे व वर्तमान विद्यार्थ्यांचे वर्ग घेणे अशी धावपळ सुरू असताना ‘एटीकेटी’च्या परीक्षांची जबाबदारीदेखील महाविद्यालयांच्या प्राध्यापकांवर आली आहे. त्यामुळे अनेकांमध्ये विद्यापीठाबाबत नाराजीचा सूर आहे.
‘कोरोना’मुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबल्या. अंतिम वर्षाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षा तर आटोपल्या, मात्र ‘एटीकेटी’ तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरुन प्रश्न उपस्थित होत होते. अखेर विद्यापीठाने २८ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ या कालावधीत महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्या व त्यानंतर लेखी परीक्षेचे आयोजन करावे असे निर्देश जारी केले. महाविद्यालयांकडून ‘ऑनलाईन’ किंवा ‘ऑफलाईन’ माध्यमातून परीक्षा घेण्यात येत आहे. बहुपर्यायी प्रश्न विचारण्याचीदेखील मुभा देण्यात आली आहे.
मात्र यामुळेच प्राध्यापकांचे काम वाढले. बहुपर्यायी प्रश्नांची ‘बँक’ प्राध्यापकांकडे नव्हती. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करताना अनेकांचा कस लागला. शिवाय परीक्षांचे आयोजन, मूल्यांकन, गुण विद्यापीठाकडे पाठविणे या सर्व जबाबदाºयादेखील त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळे वेळापत्रकाची जुळवाजुळव करताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले असताना भार मात्र महाविद्यालयांवर टाकला आहे, अशी भावना एका प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखविली.
प्रति विद्यार्थी मिळणार २० रुपये
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क केला असता काही प्राध्यापकांमध्ये गैरसमज असल्याचे त्यांनी सांगितले. वस्तुत: विद्यापीठदेखील परीक्षा व निकालांशी संबंधित कामे करतच आहे. शिवाय परीक्षांचे आयोजन करत असताना महाविद्यालयांना प्रति विद्यार्थी २० रुपये देण्यात येणार आहे. ‘कोरोना’ काळात विद्यार्थी हित लक्षात घेता महाविद्यालयांकडे परीक्षांची जबाबदारी देण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.