लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगोदरच कोरोनाचा फटका बसलेल्या विद्यापीठांसमोर आता ऑनलाईन परीक्षांचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत आता विद्यापीठातील अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. २४ सप्टेंबरपासून हे आंदोलन करण्यात येणार असून निश्चितपणे याचा परीक्षांच्या कामांवर परिणाम होणार आहे. १ ऑक्टोबरपासून परीक्षांना सुरुवात होणार असून यामुळे आता विद्यापीठांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतन संरचना त्वरित लागू करावी ही यातील प्रमुख मागणी आहे. राज्य शासनाने अकृषी विद्याापीठ आणि महाविद्याालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामधून वगळल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आवाज बुलंद केला आहे. वेतन आयोगासाठी राज्यभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यावर शासनाने यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वाासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, शासनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप संघटनांकडून लावण्यात आला.१ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन केले आहे. अशा स्थितीत हे आंदोलन आणखी समस्या वाढविणारे ठरु शकते. मागण्या पूर्ण न झाल्यास १ ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
स्वाक्षरी करुन आंदोलनस्थळी जमणार कर्मचारी२४ सप्टेंबरपासून कर्मचारी कामावर येतील, मात्र ते स्वाक्षरी करुन आंदोलनाच्या ठिकाणी एकत्रित येतील. नागपूर विद्यापीठाच्या महाराज बागसमोरील परिसरात हे आंदोलन होईल. सर्वच कर्मचारी व अधिकारी संघटना यात सहभागी होतील. यात महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरम, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षकेतर सेवक संघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी संघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिकारी फोरम यांचा समावेश असेल, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. पत्रपरिषदेला प्रवीण गोतमारे, मनीष झोडापे, दिनेश दखने, बाळू शेळके, मारोती बोरकर, सुधाकर पाटील, राजेंद्र पाठक, प्रदीप मसराम, चंद्रमणी सहारे, दर्पण गजभिये, याकूब शेख प्रामुख्याने उपस्थित होते.