आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट-विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळासाठी शनिवारी रेकॉर्डब्रेक (९२.८२ टक्के) मतदान झाले. सात वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांचे ठोकेही वाढले आहेत.सिनेटच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी पाच जिल्ह्यातील ८६ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली. दुपारपर्यंत बहुतांश मतदान केंद्रांवर ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.सिनेट, विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळाच्या विविध गटासाठी सेक्युलर पॅनेल, यंग टीचर्स असोेसिएशन, नुटा आणि शिक्षण मंचाने उमेदवार मैदानात उभे केले होते. यातील काही मतदार संघात तिहेरी तर काही ठिकाणी चौरंगी लढती झाल्या. मात्र शिक्षक आणि संस्थाचालकांनी केलेल्या विक्रमी मतदानाने विजयाचा कोटा पार करण्यासाठी काही मतदारसंघ गटात उमेदवाराला निश्चितच घाम फुटणार आहे.सकाळी ९.३० वाजता मतदानाची टक्केवारी ३६ टक्के होती. मतदारांचा मतदान केंद्राकडील कल बघता दुपारी २.३० वाजता मतदानाची टक्केवारी ६५ टक्के तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत ९२.८२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान सिनेटच्या महाविद्यालय व्यवस्थापन प्रतिनिधी गटासाठी झाले. या गटात ९७.९३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान सिनेट आणि विद्वत् परिषदेच्या शिक्षक मतदार गटात झाले. येथे क्रमश: ८७.२३ टक्के आणि ८८ टक्के मतदान झाले. विभागातील पाचही जिल्ह्यातील मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पूरणचंद्र मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.