नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘मिक्स मोड’मध्ये उन्हाळी परीक्षा घेण्याची घोषणा केल्यानंतर विद्यापीठ वर्तुळातून ‘ऑनलाईन’ परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. या निर्णयाच्या पाचच दिवसांनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सर्व कुलगुरूंनी ‘ऑफलाईन’ परीक्षा घेण्याचे निश्चित केले. यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या संपूर्ण मुद्यावर नागपूर विद्यापीठाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
अगोदर नागपूर विद्यापीठाने ‘ऑफलाईन’ परीक्षांची तयारी केली होती. प्रश्नपत्रिकांचे कामदेखील पूर्णत्वास आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व ‘एनएसयुआय’ने उन्हाळी परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातूनच घ्याव्यात, अशी मागणी करीत आंदोलन केले. जर बहुतांश वर्ग ‘ऑनलाईन’ झाले तर परीक्षा ‘ऑफलाईन’ का, असा त्यांचा सवाल होता. विद्यार्थी संघटनांच्या दबावापुढे झुकून विद्यापीठाने स्वत:ची भूमिका बदलविली व सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा निर्णय घेतला. सर्व प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑफलाईन’, तर ‘थिअरी’ परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना ऑफलाईन परीक्षा द्यावी लागेल, असेदेखील परीक्षा मंडळाने ठरविले. याच मुद्द्यावरून विद्यापीठ वर्तुळातून विरोध होण्यास सुरुवात झाली.
विविध तांत्रिक कारणांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत ऑनलाईन परीक्षा देता आल्या नाहीत, तर त्यांना ‘ऑफलाईन’ फेरपरीक्षा द्यावी लागेल. त्यात त्यांच्या निकालावर परिणाम होण्याचा धोका तज्ज्ञांनीदेखील व्यक्त केला. कुलगुरू व प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असतानाच सोमवारी उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरूंसोबत ऑनलाईन माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत सर्व कुलगुरूंनी ‘ऑफलाईन’ परीक्षा घेण्यास अनुमोदन दिले. मात्र, आता पुढे काय करायचे, याबाबत नागपूर विद्यापीठाने काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणखी संभ्रम वाढला आहे.
शासनाच्या लेखी सूचनांची प्रतीक्षा
याबाबत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता, त्यांनी उच्चशिक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीबाबत व निर्देशांबाबत केवळ ऐकले असल्याचे सांगितले. राज्य शासनाचे कुठलेही लेखी निर्देश किंवा सूचना अद्यापपर्यंत प्राप्त झाले नाहीत. सूचना आल्यानंतर कुलगुरूंशी चर्चा करून पुढील पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले उच्च-शिक्षणमंत्री
कोरोना नियंत्रणात असून, ‘ऑफलाईन’ परीक्षा झाल्या पाहिजे. राज्यातील अकृषी विद्यापीठातील कुलगुरूंशी झालेल्या बैठकीत सर्वांनी एकमुखी ‘ऑफलाईन’ परीक्षांची भूमिका मांडली. सर्व कुलगुरूंच्या निर्णयासोबत शासन असेल असे उच्च-शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.