लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. परंतु विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही ‘ऑनलाईन’ अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता १९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटनांनीदेखील मागणी केली होती. विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकदेखील जारी केले आहे.
‘कोरोना’मुळे लांबलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त अखेर डिसेंबर महिन्यात निघाला. ‘कोरोना’ची एकूण स्थिती व हाती असलेला कमी वेळ लक्षात घेता, विद्यापीठाने ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीभूत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमामध्ये एलएलएम (मास्टर ऑफ लॉ), एमकॉम (प्रोफेशनल), एमएस्सी, एमसीटी (मास्टर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी), मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व ‘एमआयआरपीएम’ (मास्टर ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स अॅन्ड पर्सनल मॅनेजमेंट) यांचा समावेश आहे. नियोजित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १२ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करायचे होते व २० डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार होती.
मात्र अनेकदा ‘सर्व्हर डाऊन’ होणे, मोबाईल अगोदरच ‘रजिस्टर’ झाला आहे, असे लिहून येणे, असे विद्यार्थ्यांना संदेश आले. तर काही विद्यार्थ्यांच्या सहाव्या सत्राच्या गुणपत्रिका अवैध असल्याचे दाखविल्या गेले. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी व संघटनांकडून करण्यात आली. अखेर विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला.
आता १६ जानेवारीपासून वर्ग
नियोजित वेळापत्रकानुसार १४ जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात होणार होती. परंतु विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक जारी केले असून, त्यानुसार १६ जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत, तर २९ डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.
पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज दाखल करणे - १९ डिसेंबरपर्यंत
तात्पुरती गुणवत्ता यादी - २५ डिसेंबर
आक्षेप - २६ ते २८ डिसेंबर
अंतिम गुणवत्ता यादी - २९ डिसेंबर (३ वाजता)
पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम - ३० ते ३१ डिसेंबर
जागांची वाटप यादी - ३ जानेवारी
महाविद्यालयात रिपोर्टिंग - ४ ते ८ जानेवारी
पहिल्या यादीतील रिक्त जागा - ८ जानेवारी
दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम - ८ ते १० जानेवारी
जागांची वाटप यादी - १२ जानेवारी
महाविद्यालयात रिपोर्टिंग - १३ ते १५ जानेवारी २०२१
शैक्षणिक वर्गांना सुरुवात - १६ जानेवारी २०२१