नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एका अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाच्या लेटलतिफीबाबत लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर विद्यापीठ वर्तुळात जलद गतीने हालचाली होऊन संबंधित निकाल तात्काळ जाहीर करण्यात आला आहे. लोकमतने यासंदर्भात सविस्तर वृत्त देऊन या दिरंगाईला वाचा फोडली होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या कुटुंब समुपदेशन या विषयाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या २०१९ च्या बॅचमधील ५०हून अधिक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. वारंवार विचारणा करूनही यासंदर्भात विद्यापीठाकडून कुठलेही समाधानकारक उत्तर विद्यार्थ्यांना दिले जात नव्हते.
लोकमतने २३ डिसेंबर रोजी यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर विद्यापीठाने जलद गतीने या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला.
संकेतस्थळावर निरंतर शिक्षण विभागाच्या परीक्षांबाबत माहितीच नाही
आश्चर्याची बाब म्हणजे मोठमोठे दावे करणाऱ्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निरंतर शिक्षण विभागाच्या परीक्षांबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही.