योगेश पांडे
नागपूर : महात्मा गांधी म्हणजे सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत प्रतीक. बापूंच्या संस्कारांचा नंदादीप आजही कोट्यवधी भारतीयांच्या मनात तेवत आहे. गांधीजींना सेवाग्राम येथे आश्रम उघडण्यासाठी आग्रह करणारे व्यक्तिमत्त्व होते जमनालालजी बजाज. या दोघांची प्रेरणा समोर ठेवून प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी शिक्षणक्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा संकल्प घेतला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जडणघडणीत त्यांचा मौलिक वाटा होता. त्यांनी मोठे मन दाखवत विद्यापीठाला कोट्यवधींचा निधी दिला होता.
‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) अंतर्गत देशात कुठेही सामाजिक उपक्रमांसाठी निधी देणे राहुल बजाज यांना शक्य होते. परंतु ‘सीएसआर’साठी राहुल बजाज यांनी ज्या विद्यापीठात महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेले सेवाग्राम येथथे व ज्या वर्धा, नागपूरच्या भूमीत जमनालाल बजाज यांनी वास्तव्य केले तेथील विद्यापीठाची निवड केली. राहुल बजाज यांच्या निर्देशांनंतर बजाज उद्योग समूहातर्फे २८ मे २०१४ रोजी ई-मेल पाठवून इमारत बांधकामासाठी १० कोटी रुपये देण्याची बजाज कंपनीची इच्छा असल्याचे कळवले होते. ‘सीएसआर’ अंतर्गत हा निधी दिला जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले होते.
आश्वासनाची पूर्ततादेखील केली
२०१४ साली विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत प्रस्तावित होती. यासाठी तेव्हा २२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. सुरुवातीला बजाज यांनी १० कोटी रुपये देण्याची तयारी दाखविली होती. त्यानंतर खर्चाची रक्कम ३० कोटींवर गेली. इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बजाज यांनी एकूण खर्चापैकी अर्धी रक्कम देण्याची घोषणा केली होती व त्याची पूर्ततादेखील त्यांनी केली.
विद्यापीठाने केला कामाला उशीर
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंबर २०१५ रोजी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पार पडले. यावेळी राहुल बजाज यांनी हे काम २ वर्षांत पूर्ण व्हायला हवे व १ ऑक्टोबर २०१५ पासून याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होईल, असे प्रतिपादन केले होते. प्रत्यक्षात काम लांबत गेले व १९ डिसेंबर २०१९ मध्ये इमारतीचे उद्घाटन झाले होते. इमारतीला जमनालाल बजाज यांचे नाव देण्यात आले.
३ मिनिटांचे ५ कोटी
कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राहुल बजाज दोघांमधील मौखिक करारातून विद्यापीठाला आणखी ५ कोटींचा निधी मिळाला होता मी कार्यक्रमात ८ मिनिटे बोलेन असे बजाज यांना कबूल केले होते. परंतु आता मी केवळ ५ मिनिटेच बोलतो व वाचलेल्या ३ मिनिटांच्या बदल्यात बजाज यांनी विद्यापीठाला आणखी ५ कोटींची मदत द्यावी, असे फडणवीस म्हणाले होते. यावर बजाज यांनीदेखील नवे दीक्षांत सभागृह सर्वांना उपलब्ध करून द्यावे, अशी अट टाकत अतिरिक्त निधी देण्याची तत्काळ घोषणा केली होती.