आॅनलाईन लोकमतनागपूर : एका ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’च्या ‘अॅडमिन’ला ‘आरटीएमएनयू’ हे नाव वापरविण्यावरुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कायदेशीर नोटीस बजावली होती. या मुद्द्यावरुन विद्यापीठ वर्तुळात चर्चांचे मोहोळ उठले असून ‘अॅडमिन’ महेंद्र निंबर्ते यांनी या नोटीशीला उत्तर दिले आहे. विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापीठाची ओळख जर प्रशासन ‘आरटीएमएनयू’ अशी सांगत असेल तर तो राष्ट्रसंतांचा अपमान आहे, असे निंबर्ते यांनी म्हटले आहे.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य महेंद्र निंबर्ते यांनी ‘आरटीएमएनयू-ए’ या नावाचा ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ तयार केला आहे. या ‘ग्रुप’चे ‘आयकॉन’ म्हणून नागपूर विद्यापीठाच्या इमारतीचे चित्र लावले होते. यात शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. विद्यापीठासह समाजातील विविध घडामोडींवर येथे मतमतांतरे व्यक्त करण्यात येतात. या ‘ग्रुप’च्या नावात ‘आरटीएमएनयू’ आणि विद्यापीठाचे छायाचित्र वापरल्यामुळे विद्यापीठाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, असे कारण देत प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली होती. विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांना ‘ग्रुप’मधून न काढल्यास फौजदारी कारवाईचा इशारादेखील देण्यात आला होता.या नोटीशीला उत्तर देताना निंबर्ते यांनी कुलगुरू व कुलसचिवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुलगुरू व कुलसचिवांच्या विरोधात आवाज उठविला म्हणून त्यांनी असे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाचे नाव ‘आरटीएमएनयू’ असे नाही. विद्यापीठाच्या कुठल्या कायद्यानुसार असे नाव किंवा ‘शॉर्टफॉर्म’ ठरविण्यात आला, असा प्रश्न निंबर्ते यांनी उपस्थित केला आहे. ‘आरटीएमएनयू’चा आमचा ‘फुलफॉर्म’ हा ‘रिस्पेक्टिव्ह टीचर्स, मॅच्युअर नेटीझन्स अॅन्ड यू’ असा असून ‘ग्रुप आयकॉन’मध्ये विद्यापीठासमोर घेतलेले माझे छायाचित्र टाकले आहे. शिवाय या ‘ग्रुप’चे अनेक लोक ‘अॅडमिन’ आहेत. तरीदेखील जाणीवपूर्वक माझ्याविरोधात हे पाऊल उचलण्यात आले, असा आरोप निंबर्ते यांनी उत्तरातून केला आहे.
नागपुरातील एका व्हॉट्सअॅप ग्रूपला ‘आरटीएमएनयू’ असे नाव देण्यावरून दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कायदेशीर नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 10:36 PM
एका ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’च्या ‘अॅडमिन’ला ‘आरटीएमएनयू’ हे नाव वापरविण्यावरुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कायदेशीर नोटीस बजावली होती. या मुद्द्यावरुन विद्यापीठ वर्तुळात चर्चांचे मोहोळ उठले असून ‘अॅडमिन’ महेंद्र निंबर्ते यांनी या नोटीशीला उत्तर दिले आहे.
ठळक मुद्देमहेंद्र निंबर्तेंचे विद्यापीठाच्या नोटीशीला प्रत्युत्तर कुलगुरू, कुलसचिवांवर केली टीका