लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जेएनयू’मध्ये प्राध्यापक व विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील उमटले. या मुद्द्यावरुन सकाळच्या सुमारास विद्यार्थी संघटनांनी अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे केंद्र शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने डाव्या पक्षांचेच हे षडयंत्र असल्याचा आरोप करत आंदोलन केले. दोन्ही विद्यार्थी संघटनांंचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी असल्याने तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने शांततामय पद्धतीने आंदोलन झाले. सकाळी नऊ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना तर साडेनऊ वाजता अभाविपतर्फे आंदोलन होणार होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘जेएनयू’मधील हल्लेखोरांवर कारवाई करावी या मागणीसाठी निदर्शने सुरू केली. परंतु काही वेळातच केंद्र शासनाविरोधात नारेबाजी सुरू झाली. सुमारे सव्वा तास त्यांची निदर्शने चालली. यावेळी शिलवंत मेश्राम यांच्यासह भूषण वाघमारे, प्रिती रामटेके, स्नेहल वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.यादरम्यान अभाविपचे कार्यकर्तेदेखील परिसरात गोळा झाले होते व अगोदरचे आंदोलन संपण्याची ते प्रतिक्षा करत होते. पाऊणे अकरा वाजताच्या सुमारास अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. डाव्या पक्षांकडून देशाचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यापीठांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडवून आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. यावेळी अभाविपचे नागपूर महानगर मंत्री अमित पटले, करिमा सिंग, वैभव बावनकर प्रामुख्याने उपस्थित होते. साडेअकराच्या सुमारास राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तदोन्ही विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाच्या वेळेत अर्ध्या तासाचेच अंतर होते. त्यामुळे अकारण तणाव उत्पन्न होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना सूचना दिली होती. पोलिसांचा ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वारावर सकाळपासूनच बंदोबस्त होता. दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकाच परिसरात जमा झाल्यानंतर तर दंगल प्रतिबंधक पथकदेखील तैनात करण्यात आले. प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनीदेखील सकाळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.आंदोलनाची परवानगीच नव्हतीविद्यार्थी संघटनांना ‘कॅम्पस’मध्ये आंदोलन करण्याची परवानगीच देण्यात आली नव्हती. तरीदेखील आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे प्रवेशद्वाराच्या बाहेर आंदोलन केले तर ताब्यात घ्यावे लागेल असे पोलिसांनी अगोदरच स्पष्ट केले होते. त्यामुळे दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आतच आंदोलन केले. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी ‘कॅम्पस’मध्ये जाणारे विद्यार्थी उत्सुकतेपोटी प्रवेशद्वाराजवळ थांबत होते. त्यामुळे मोठ्या प्रमामात आंदोलन सुरू आहे असे चित्र निर्माण झाले होते. परंतु प्रत्यक्षात ‘कॅम्पस’मधील जास्त विद्यार्थी या निदर्शनांमध्ये सहभागीच झाले नव्हते.
'जेएनयू'वरुन नागपूर विद्यापीठ तापले : 'कॅम्पस'मध्ये आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 9:19 PM
‘जेएनयू’मध्ये प्राध्यापक व विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील उमटले.
ठळक मुद्दे‘अभाविप’ डाव्या पक्षांविरोधात आक्रमक, आंबेडकर विद्यार्थी संघटनेची सरकारविरोधात निदर्शने