नागपूर : लीळाचरित्र हा ग्रंथ मानवी परिवर्तनाचा इतिहास आहे. स्वामींचे हे चरित्र अमृतकुंभ असून, महानुभाव पंथीयांचा हा आद्यग्रंथ आहे. महानुभाव पंथाची ओळख या देशाला नागपूरने दिली आहे. नागपूर विद्यापीठाने लीळाचरित्राचे अनेक संशोधक, अभ्यासक दिले आहेत. असे असताना विद्यापीठाने बी.ए.च्या मराठी साहित्य विषयाच्या अभ्यासक्रमातून महानुभाव साहित्य ग्रंथाला वगळले आहे. हा एक प्रकारे तपस्येचा अपमान आहे. परंपरेकडे केलेले दुर्लक्ष असून, ज्ञानाची परंपरा नाहीशी करण्याचा प्रकार असल्याचे मत आद्यग्रंथ लीळाचरित्र एकांक ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केले.
आचार्य श्री ऋषिराजबाबा प्रतिष्ठान व अ.भा. महानुभाव महामंडळाच्या वतीने आद्यग्रंथ लीळाचरित्र एकांक ग्रंथ प्रकाशन सोहळा, भाद्रपद शुद्ध द्वितीया जागतिक मराठी दिवस, भव्य अष्ट शताब्दी कृतज्ञता सोहळा व सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत अवतार दिन महोत्सवाचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या सोहळ्याला कविश्वर कुळाचार्य महंत श्री दर्यापूरकर बाबा, महंत श्री अचलपूरकर बाबा, महंत श्री गोवर्धनमुनी अंकुळनेरकर, पू.म.त. प्रेमीला अक्का पंजाबी, महंत श्री अष्टुरकरबाबा, महंत श्री गोविंदराज रिद्धपूरकरबाबा यांची प्रमुख उपस्थिती होती, तर विशेष अतिथी म्हणून आ. मोहन मते, आ. अभिजित वंजारी, सभापती हुकूमचंद आमधरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर यांच्यासह ज्येष्ठ संशोधक डॉ. म. रा. जोशी, डॉ. लता लांजेवार, डाॅ. किरण वाघमारे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बी.ए. मराठी साहित्य विषयाच्या अभ्यासक्रमात महानुभाव साहित्य ग्रंथाचा पूर्वपरंपरेनुसार पुन्हा समावेश करावा व पंचकृष्ण चरणांकित तीर्थस्थानांच्या महसूल विषयक दस्तावेजात नोंदी कराव्यात तसेच ब्रह्मविद्या शास्त्राची अवहेलना करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना अचलपूरकर बाबा म्हणाले की, परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाची जो जोपासना करतो त्यांना मोक्ष मिळतो. पण व्हॉट्सॲपवरील परमेश्वराचे तत्त्वज्ञान शास्त्राची मोडतोड करणारे आहे. अभिजित वंजारी म्हणाले, महानुभाव साहित्य आम्ही अभ्यासले आहे. मात्र, काही साहित्य अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे विद्यार्थी त्यापासून वंचित राहणार आहे, ही आपल्या सांस्कृतिक इतिहासाची गळचेपी आहे. नागपूर विद्यापीठाने या साहित्याचा पुन्हा समावेश करावा.
आ. मोहन मते म्हणाले, महानुभाव पंथीयांचा माझा जवळचा संबंध आहे. वगळलेल्या साहित्याचा पुन्हा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. डॉ. म. रा. जोशी म्हणाले की, एकांक ग्रंथ ही स्वामींच्या भ्रमणाची पहिली परिक्रमा आहे. मराठी साहित्यातील हे पहिले आत्मचरित्र आहे. ज्ञानाची श्रेष्ठ परंपरा असलेल्या पंथाचे आपण पाईक असल्याचे ते म्हणाले. डॉ. लता लांजेवार म्हणाल्या की, लीळाचरित्र अमृतकुंभ आहे. ८०० वर्षांआधीचा हा ग्रंथात स्वामींचे विचारधन आहे आणि ते अक्षय आहे. या सोहळ्याचे प्रास्ताविक महामंडळाच्या अध्यक्ष तृप्ती बोरकुटे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष लीलाधर राजनकर यांनी केले. संचालन नरेंद्र खेडीकर यांनी, तर सोनिया जाखड यांनी आभार मानले.
- एकांक ग्रंथ मराठी साहित्यिक, अभ्यासकांसाठी मोठी उपलब्धी
कविश्वर कुळाचार्य परमपूज्य परम महंत दर्यापूरकर बाबा महानुभाव अमरावती कृतज्ञता सोहळ्यामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत अष्टशताब्दी अवतार दिन कृतज्ञता सोहळ्यात आद्यग्रंथ लीळाचरित्र एकांक ग्रंथाचे प्रकाशन झाले. हे मराठी साहित्यिक, रसिक, अभ्यासक आणि भाविकांसाठी फार मोठी उपलब्धी आहे. धर्म सेवेत रत असलेल्या अखिल भारतीय महानुभाव महामंडळ ही संघटना सातत्याने लीळाचरित्र ग्रंथाच्या शुद्धतेसाठी तळमळीने प्रयत्न करीत आहे. महामंडळाने राबवलेले सर्वच उपक्रम ईश्वर कृपेने यशस्वी झाले आहेत. महामंडळाकडून यापुढेसुद्धा असेच सत्कार्य घडत राहो हे शुभचिंतन करतो.