लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे कुलसचिव तसेच चारही विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांच्या पदभरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. परंतु अधिष्ठाता पदासाठीच्या जाहिरातीत मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक अशी अटच टाकण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील विद्यापीठ असताना ही अट वगळण्यात आल्याने विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, अनेकांनी अधिष्ठाता पदासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काही दिवसांअगोदर अधिष्ठाता पदासाठी जाहिरात देण्यात आली आहे. याअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्याशास्त्र, आंतरशास्त्रीय तसेच वाणिज्य-व्यवस्थापन या विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांची भरती होणार आहे.
कुलसचिव पदासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रतेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य अशी अट टाकण्यात आली आहे. परंतु अधिष्ठाता पदासाठीच्या अटींमध्ये अनिवार्यऐवजी भाषेचे ज्ञान योग्य ठरेल असा उल्लेख आहे. विद्यापीठातील बहुतांश प्रशासकीय कामे ही मराठी भाषेतून चालतात. असे असतानाही नागपूर विद्यापीठाने अधिष्ठाता पदांची भरती करताना मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्राचार्य फोरमतर्फे मागणी
प्राचार्य फोरमतर्फे या जाहिरातीसंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नियमानुसार ही जाहिरात चुकीचीच आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचे ज्ञान हा गंभीर व चर्चेचा विषय आहे. मुळे तत्काळ जाहिरातमध्ये बदल करावा व अधिष्ठाता पदासाठी मराठी भाषा अनिवार्य करावी, अशी मागणी प्राचार्य फोरमने केली आहे.