नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षांमधील अव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधील एका पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारण्याचे प्रकरण मिटले नसताना आता कॉम्प्युटर टेक्नाॅलाॅजीच्या अंतिम सेमीस्टरच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील तब्बल ८० टक्के प्रश्न विचारण्यात आल्याचे नवीनच प्रकरण समाेर आले आहे.
विद्यापीठातर्फे इंजिनिअरिंग अंतिम वर्षाच्या ८व्या सेमीस्टर परीक्षेचा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या ‘क्लाउड कॉम्प्युटिंग’ या विषयाचा पेपर ३१ मे रोजी घेण्यात आला. या पेपरमधील ८० टक्के प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे पेपर सोडविणे कठीण गेले असून, विद्यार्थ्यांची नापास होण्याची चिंता वाढली आहे. याबाबत रामटेकच्या किट्स इंजिनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे २ जूनला तक्रार केली. काॅलेजमधील या विषयाच्या १५० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. प्राचार्यांनी या तक्रारीची दखल घेत नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाला याबाबत एक पत्र पाठवले. परीक्षा प्रमुख डाॅ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची विनंती केली. मात्र, अद्याप नागपूर विद्यापीठाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याचे सांगण्यात येत आहे.
नापास झाले तर..?
अंतिम वर्ष असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाले आहे. अनेकांनी पीजी अभ्यासक्रमासाठी आवेदन केले आहे. परीक्षेत विद्यार्थी नापास झाले तर नाेकरीही जाईल व वर्षही वाया जाईल. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रार दिली हाेती. त्यानुसार महाविद्यालयाचे पत्र जाेडून नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला पाठविण्यात आले हाेते. परीक्षा प्रमुखांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार नाही, असा विश्वास दिला हाेता. विद्यापीठाने विद्यार्थी हिताची भूमिका घ्यावी.
-डाॅ. श्रीखंडे, प्राचार्य, किट्स इंजिनिअरिंग काॅलेज