लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी विद्यापीठातर्फे अभ्यास मंडळाच्या बैठका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात पत्रदेखील जारी करण्यात आले आहे. दरम्यान, उन्हाळी परीक्षा स्थगित करण्याचा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. सरकारकडून काहीही सूचना आली नसल्याने सध्या तरी नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होतील, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.जगभरात ‘कोरोना’चा ताप वाढत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेदेखील यासंदर्भात पाऊल उचलले आहे. ‘यूजीसी’च्या सूचनेनंतर विद्यापीठाने दोन दिवसांअगोदरच सर्व परिसंवाद, कार्यशाळा व व्याख्यान रद्द केले. त्याचप्रमाणे सर्व महाविद्यालयांनादेखील ‘कोरोना’पासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विद्यापीठात ९ तारखेपासून अभ्यास मंडळांच्या बैठकांना सुरुवात झाली. या बैठका २४ मार्चपर्यंत चालणार होत्या. परंतु १३ मार्चपासूनच्या अभ्यास मंडळाच्या बैठका, निवडणूक, तदर्थ समिती व विशेष कार्य समितीच्या सभा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विद्या शाखेचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी दिली.परीक्षेसंदर्भात ‘वेट अॅन्ड वॉच’नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. या परीक्षा समोर ढकलण्यात येतील, अशी विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता, असा कुठलाही निर्णय अद्याप झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाकडून आम्हाला कुठल्याही सूचना किंवा निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा सुरू आहेत. जर वरिष्ठ पातळीहून काही सूचना आल्या तर मग पुढील पावले उचलू, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर साबण तसेच ‘सॅनिटायझर्स’ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचा खर्चदेखील विद्यापीठ देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागपूर विद्यापीठ :अभ्यास मंडळाच्या बैठका स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:24 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी विद्यापीठातर्फे अभ्यास मंडळाच्या बैठका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठळक मुद्देपरीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकारच्या सूचनांकडे लक्ष