योगेश पांडे
नागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षा, निकाल, वेळापत्रक इत्यादींची माहिती देण्यात येतेच; परंतु विद्यार्थ्यांना या बाबी अगदी सहजतेने कळाव्यात, यासाठी आता ‘मोबाईल ॲप’ विकसित करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कुठेही बसल्या बसल्या ‘स्मार्ट फोन’मध्ये एका ‘क्लिक’वर सर्व माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.
‘कोरोना’च्या काळात विद्यापीठाची संपूर्ण प्रणाली जवळपास ‘ऑनलाईन’वर गेली होती. अगदी परीक्षांपासून ते पीएच.डी. व्हायवादेखील ऑनलाईन माध्यमातून झाले. ‘कोरोना’च्या अगोदरच विद्यापीठाने विद्यार्थ्यांपर्यंत विद्यापीठातील परीक्षांचे वेळापत्रक, निकाल इत्यादींची माहिती तत्काळ पोहोचावी यासाठी ‘मोबाईल ॲप’ तयार करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दोन वर्षे हा प्रकल्प मागे पडला होता. अखेर यावर काम सुरू झाले व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीएमएनयू ई सुविधा’ हे ‘मोबाईल ॲप’ तयार करण्यात आले. अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या ‘ॲप’ची मागणी लावून धरली होती. विद्यापीठानेदेखील यावर काम सुरू केले होते. पण कोरोना काळात हे ॲप ‘लॉन्च’ करणे शक्य झाले नव्हते, असे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले.
काय होणार फायदा ?
या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना सर्वप्रकारची माहिती, परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट, निकाल, डिजिटल गुणपत्रिका आणि अन्य दस्तावेजदेखील डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी परीक्षा अर्जदेखील भरू शकणार असून, इतर शुल्काची माहितीदेखील जाणून घेऊ शकतील, असा दावा प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केला. प्रत्येक विद्यार्थ्याला ‘युजर आयडी’ देण्यात येईल. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. यासह विद्यापीठाकडून वेळोवेळी काढण्यात येणारी विविध परिपत्रकेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा बराच लाभ होईल व माहितीचा अभाव राहणार नाही.
संकेतस्थळ नेहमीच असते वादात
नागपूर विद्यापीठाचे संकेतस्थळ हा कायम वादाचा विषय राहिला आहे. अनेकदा संकेतस्थळ ‘अपडेट’ नसल्याच्या अनेक तक्रारीही विद्यापीठाकडे प्राप्त होत असतात. मात्र तरीदेखील ही बाब फारशी गंभीरतेने घेण्यात येत नाही. आता ‘ॲप’वर तरी गंभीरतेने काम होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सहा वर्षांअगोदर झाला होता प्रयत्न
सहा वर्षांअगोदर विद्यापीठाने स्वत:चे ‘मोबाईल ॲप’ तयार करण्याचा प्रयत्न केला होता. ‘एमकेसीएल’च्या मदतीने हे ‘ॲप’ तयार करण्यात येणार होते. परंतु त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर ‘पीएच.डी.’ संशोधकांसाठी विद्यापीठाने ‘मोबाईल ॲप’ विकसित केले. याच्या माध्यमातून संशोधकांना त्यांच्या ‘थिसीस’ मूल्यांकनाची नेमकी स्थिती समजू शकते.