योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. यासाठी विशेष मोबाईल अॅपदेखील विकसित केले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा प्रवेशपत्राबाबत घडलेली अजबच बाब समोर आली आहे. प्रवेशपत्रावर एकाच महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ज्योती असे आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. सर्व्हरवरील ताणामुळे प्रवेशपत्रातील हा घोळ झाला होता व आता ही त्रुटी दूर करण्यात आली असल्याचा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले व ते महाविद्यालयांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे होते. मात्र कर्मचारी आंदोलनामुळे १ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरूच झाली नाही. दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले व ते विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन माध्यमातून पोहोचवले. यातील तब्बल ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ज्योती असे नमूद करण्यात आले होते. ही बाब महाविद्यालयाने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. याची चौकशी केली असता सर्व्हरवरील ताणामुळे २८ व २९ सप्टेंबर रोजी काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राचा डाटा मिसमॅच झाल्याची माहिती मिळाली. परीक्षेचे मोबाईल अॅप हे विद्यार्थ्यांसाठीच होते. मात्र आवश्यकता नसतानादेखील विद्यार्थी सोडून अनेकांनी हे अॅप डाऊनलोड केल्यामुळे सर्व्हरवरील ताण वाढला होता. आता ही त्रुटी दूर करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुधारित ओळखपत्रे पोहोचली आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार प्रवेशपत्रअनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालये प्रवेशपत्रे देण्यासंदर्भात सहकार्य करत नसल्याची बाब मांडली होती. विद्यार्थ्याना प्रवेशपत्र मिळण्यास अडचणी येऊ नये यासाठी विद्यापीठाने नवीन लिंक तयार केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत:चे प्रवेशपत्र घरबसल्या डाऊनलोड करता येणार आहे, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.