योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बहुतांश उन्हाळी परीक्षा आटोपली असून, काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना तर अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा आहे.
नागपूर विद्यापीठाने साडेपाचशेहून अधिक अभ्यासक्रमांच्या थेट वेबबेस्ड परीक्षा घेतल्या. यात विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश होता. काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांमुळे नियोजित कालावधीत पेपर देता आले नाही. त्यांच्यासाठी विद्यापीठाने फेरपरीक्षादेखील घेतल्या. ‘ऑनलाइन’ परीक्षा झाल्याने लवकर निकाल लागतील, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती; मात्र काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थी प्रतीक्षेतच आहेत. (Nagpur University; Neglect by colleges; Hit the results)
साडेपाचशेपैकी विद्यापीठाने आतापर्यंत ७१ निकालच घोषित केले आहेत. यात बहुतांश निकाल हे अंतिम सत्र किंवा अंतिम वर्षांचे आहेत. निकालांना नेमका उशीर का होत आहे, याची चाचपणी केली असता महाविद्यालयांच्या वेळकाढूपणाचा फटका बसल्याची बाब समोर आली. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सत्रातील एकूण कामगिरीवरून अंतर्गत मूल्यमापन करायचे होते. यात सेशनल परीक्षा तसेच तोंडी परीक्षांची कामगिरीदेखील विचारात घ्यायची होती. हे गुण विद्यापीठाला ‘ऑनलाइन’ माध्यमातूनच पाठवायचे होते; परंतु काही महाविद्यालयांनी ‘ऑनलाइन’ गुण विद्यापीठाला पाठविलेच नाही. त्यामुळे ‘ऑनलाइन’ परीक्षेचे गुण असूनदेखील विद्यापीठाला निकाल लावता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिकारी करत आहेत विनंती
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना संपर्क केला असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिला. काही महाविद्यालयांकडून वेळेत गुण येत नसल्याने अडचण होत आहे. परीक्षा विभागातील अधिकारी महाविद्यालयांना व्यक्तिश: संपर्क करून अक्षरश: गुण पाठविण्याची विनंती करत असल्याची माहिती त्यांनी दिली. अंतिम सत्र व अंतिम वर्षाचे निकाल लावणे अत्यावश्यक आहे. जर वेळेत निकाल लागले नाही तर विद्यार्थ्यांची उच्चशिक्षण किंवा रोजगाराची संधी हातातून निसटण्याची शक्यता आहे.