लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांची गाडी अखेर दुसऱ्या दिवशी रुळावर आली. पहिल्या दिवशी तांत्रिक अडचणींमुळे विद्यापीठाला परीक्षाच रद्द करावी लागली होती. त्यामुळे विद्यार्थी शुक्रवारी तणावात होते; परंतु ग्रामीण भागातील काही अपवाद वगळता अडथळ्यांविना परीक्षा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुमारे सव्वासहा टक्के परीक्षार्थ्यांनी लॉगीनच केले नाही. दरम्यान, शनिवारी परीक्षार्थ्यांची संख्या जास्त राहणार आहे. त्यामुळे विद्यापीठासमोर परत मोठे आव्हान असणार आहे.
विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात झाली. प्रथमच ‘वेब बेस्ड’ परीक्षा होत असल्याने थोडी धाकधूक होतीच. पहिल्याच दिवशी तांत्रिक अडथळे आले व बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नाही. त्यामुळे सगळे पेपर रद्द करावे लागले. शुक्रवारी मात्र दोन्ही सत्रांची परीक्षा सुरळीत पार पडली. शुक्रवारी १२ अभ्यासक्रमांचे एकूण १५ पेपर होते व त्यात २० हजार १४ परीक्षार्थी लॉगीन करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १८ हजार ७५७ विद्यार्थ्यांनी लॉगीन केले व १८ हजार ६२२ विद्यार्थी पेपर सबमिट करू शकले. ही टक्केवारी ९९.२८ टक्के इतकी होती.
शनिवारी विविध अभ्यासक्रमांच्या ३५,४०५ विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. त्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. हे पाहता विद्यापीठाकडून विविध तपासण्या सुरू होत्या. परीक्षा विभागाने पूर्ण तयारी केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाइल, कॉम्प्युटर व लॅपटॉपवर ‘एरर’ येत होता, ती समस्या दूर करण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांना आता अडचण येणार नाही. तरीदेखील आमचा संपूर्ण चमू दक्ष असेल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात इंटरनेटमुळे अडचणी
अनेक परीक्षांना अपेक्षेपेक्षा कमी लॉगीन झाले होते. त्यातील काही विद्यार्थी एटीकेटीवाले होते व फेरमूल्यांकनात ते उत्तीर्ण झाले. त्यामुळे ते परीक्षेला बसले नाहीत, तर ग्रामीण भागात काही ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. यात देवरी, पवनी, समुद्रपूर, लाखनी येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांबाबत लवकरच विद्यापीठाकडून निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.