लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांत सोमवारपासून प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची संख्या तोकडी असली तरी बऱ्याच महाविद्यालयांत वर्ग सुरू झाले आहेत; परंतु ५० टक्के उपस्थितीची अट असल्याने शिक्षकांसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. एकाच वर्गाला दोन बॅचमध्ये विभाजित करावे लागत असल्याने शिक्षकांवर ताण वाढला आहे. एकच बाब दोनदा शिकविण्यासाठी नियोजन करावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर ऑनलाईन अध्ययन व परीक्षा झाल्या. नवीन सत्रांतील वर्गदेखील ऑनलाईन माध्यमातूनच झाले. मात्र, आता प्रत्यक्ष वर्गखोल्यांतदेखील शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा मिक्स मोडमध्ये शिकवावे लागणार आहे. बहुतांश ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन ते तीन बॅचेसमध्ये विभाजित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकाच दिवशी संबंधित मुद्दा शिकविणे शक्य नाही. एकच विषय वेगवेगळ्या बॅचेसला शिकवावा लागणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना अक्षरशः कसरत करावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी वेगळा वेळ
एकाच वेळी ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचादेखील प्रयोग काही महाविद्यालयांत सुरू आहे. वर्गखोल्यांतच लॅपटॉप किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून घरी असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील शिकविले जात आहे. मात्र, यामुळे शिक्षकांसमोर वेगळी अडचण उभी ठाकली आहे. वर्गखोल्यांतील विद्यार्थी लगेच एखादा अडलेला मुद्दा विचारू शकतात. मात्र, ऑनलाईन माध्यमातून शिकणारे विद्यार्थी वारंवार एखादा मुद्दा विचारू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणी व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्हाला वेगळा वेळ काढावा लागत असल्याची माहिती एका विभागप्रमुखाने दिली.
डाटाचे टेन्शन वेगळे
अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांसमोर तर आणखीनच नवीन समस्या उभी ठाकली आहे. प्रथम वर्ष वगळता इतर सत्रांचे वर्ग सुरू होतेच. शिवाय आता थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी व प्रथम वर्षाचे विद्यार्थी यांचेदेखील वर्ग घ्यावे लागत आहेत. ऑनलाईन वर्गांचे प्रमाण वाढल्याने इंटरनेट डाटा पुरेनासा झाला आहे. अनेक महाविद्यालयांत अद्यापही शिक्षकांना पूर्ण वेतन मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षकांची अडचण वाढली आहे.