लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत एक संधी देण्यात येणार आहे. २५ जुलै रोजी दोन डझनाहून अधिक अभ्यासक्रमांच्या सहाव्या व आठव्या सत्राच्या ऑनलाईन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑनलाईन परीक्षेदरम्यान विविध तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेकांना पेपर देता आले नाही. काहींचे पेपर आपोआपच सबमिट झाले, तर अनेकांचे पेपर योग्य पद्धतीने सबमिटच झाले नाही. शिवाय अनेकांना तर नेटवर्क उपलब्ध नसल्याने पेपरच देता आले नाही. पेपर हुकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी होत होती. अखेर यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी परिपत्रक जारी केले आहे. यानुसार २५ जुलै रोजी विविध विषयांच्या परीक्षा घेण्यात येतील. यात बीएस्सी, बीसीए, बीएस्सी (फॉरेन्सिक), बीएस्सी (आयटी), बीएस्सी (गृहविज्ञान), बी.ए., बी.कॉम., बीबीए, बीसीसीए, या अभ्यासक्रमांचे सहावे सत्र, बीई, बीफार्म, बॅचलर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी यांचे आठवे सत्र, बी.ए (जनसंवाद) तृतीय वर्ष व बी.जे. या परीक्षांचा प्रामुख्याने समावेश आहे.
यासंदर्भात विद्यार्थ्यांनी २२ जुलैपर्यंत महाविद्यालयात तक्रार दाखल करावी. तसेच प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या लॉगिनमधून ती तक्रार विद्यापीठाला पाठवावी. तरच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.