लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएच.डी.’ नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘पेट’च्या दोन टप्प्यांमुळे नोंदणी करणाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात होते; मात्र आता विद्यापीठाने ‘पेट-२’ रद्द केली आहे. त्यामुळे आता केवळ एकाच परीक्षेचे आव्हान राहणार आहे.
विद्यापीठात पीएच.डीची बजबजपुरी माजल्यामुळे विद्यापीठाने सुरुवातीला ‘पेट’ उत्तीर्ण होणे अनिवार्य केले. डॉ.प्रमोद येवले यांच्या प्र-कुलगुरूपदाच्या कार्यकाळात विषयनिहाय ‘पेट-२’ सुरू करण्यात आली. काठिण्यपातळीत वाढ झाल्याने नोंदणीसाठी पात्र ठरणाऱ्यांची संख्या कमी झाली. शिवाय मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या बरीच रोडावली. त्यामुळे विधीसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर.जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या तयार करण्यात आल्या होत्या. या समितीने पीएच.डी.च्या जाचक अटींमध्ये बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार विद्यापीठाने शिफारशी मान्य केल्या असून, पीएच.डी. संदर्भात अधिसूचना काढली आहे.
‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘अॅप्टिट्यूड’वर भर
विद्यापीठाने ‘पेट-१’च्या स्वरूपात बदल केला आहे. ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘जनरल अॅप्टिट्यूड’वर परीक्षा आधारित असेल. शिवाय ५० प्रश्न हे बहुपर्यायी असतील. मार्च महिन्यात नव्या नियमावलीनुसार ‘पेट’ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.