लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून विद्यापीठाने दोन टप्प्यात ‘पेट’ घेणे सुरू केले असून उमेदवारांसमोरील आव्हानदेखील वाढले आहे. शिवाय दोन टप्प्यांमध्ये काही दिवसांचे अंतर असल्याने उमेदवारांना प्रतीक्षादेखील करावी लागते. त्यामुळे एकाच टप्प्यात दोन्ही पेपर घेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. शिवाय दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ पद्धतीनेच घेण्याबाबतदेखील विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मागील काही वर्षांपासून ‘पेट-१’ व ‘पेट-२’ अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. ‘पेट-१’मध्ये सामान्य ज्ञान व ‘अॅप्टिट्यूड’संबंधित प्रश्न असतात तर ‘पेट-२’मध्ये विषयाशी संबंधित प्रश्नांना स्थान असते.‘पेट-२’ मध्ये उमेदवारांना लांबलचक उत्तरे लिहावी लागतात. या परीक्षेची पातळी कठीण असल्याने अनेक उमेदवार नोंदणीसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरले. शिवाय ‘पीएचडी’, ‘एमफिल’, ‘डीलिट’ व ‘डीएस्सी’च्या नियमांसंदर्भात विद्यापीठात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेने डॉ. दिलीप पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली. या समितीच्या माध्यमातून काही दिशानिर्देशांत बदल करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार जर नवीन नियम लागू झाले तर याचा फायदा पुढील शैक्षणिक सत्रात ‘पेट’मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना होईल.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाने ‘पेट-१’ व ‘पेट-२’ दोन्ही परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचा मानस केला आहे. शिवाय ‘पेट-२’मधील प्रश्न हे वस्तुनिष्ठ असू शकतील का, याबाबतदेखील विचार सुरू आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. अद्याप काहीही अंतिम झालेले नाही. समिती यावर अभ्यास करीत आहे. मात्र ‘पेट-१’ व ‘पेट-२’ यादरम्यान १५ दिवसांचा कालावधी असतो. त्यामुळे उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे एकाच टप्प्यात दोन्ही परीक्षा होतील का, याबाबत विचार सुरू आहे. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ पद्धतीने काढणे शक्य होईल का, याचीदेखील चाचपणी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर विद्यापीठ : 'पीएचडी' नोंदणीचे आव्हान एकाच टप्प्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 8:17 PM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून विद्यापीठाने दोन टप्प्यात ‘पेट’ घेणे सुरू केले असून उमेदवारांसमोरील आव्हानदेखील वाढले आहे.
ठळक मुद्देदोन्ही पेपर वस्तुनिष्ठ करण्याचा मानस