लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या मोठ्या लाटेचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठालादेखील बसला आहे. ११ एप्रिल रोजी नियोजित विशेष दीक्षांत समारंभ व २३ एप्रिल रोजीचा १०८ वा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. विशेष दीक्षांत समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘एलएलडी’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार होते.
सरन्यायाधीश बोबडे यांचे शिक्षण नागपूर विद्यापीठातच झाले. विधिक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेता, त्यांना मानद पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडून ३ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती. विधिसभेनेदेखील या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या समारंभासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यासाठी पत्रदेखील पाठविण्यात आले होते. परंतु राष्ट्रपती कार्यालयाकडून वेळ देण्यात आली नाही. त्यामुळे कुणाला निमंत्रित करावे, हा विद्यापीठासमोर प्रश्न उभा झाला होता.
अखेर राज्यपालांच्या उपस्थितीत ११ एप्रिल रोजी समारंभ आयोजित करण्याचे नियोजन झाले. परंतु ‘कोरोना’मुळे जमावबंदी करण्यात आली असून, कार्यक्रमांच्या आयोजनालादेखील परवानगी नाही. त्यामुळे विद्यापीठाने हा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला आहे.
दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी २३ एप्रिल रोजी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाने कविवर्य सुरेश भट सभागृह आरक्षितदेखील केले होते. ‘कोरोना’मुळे ‘ऑनलाईन’ आयोजन करावे का, असा विचारदेखील पुढे आला होता. परंतु हा समारंभदेखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले.
कोल्हापूरला झाले, नागपूरला का नाही?
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ दोन दिवसापूर्वी पार पडला. ‘कोरोना’ची नियमावली लक्षात घेता, तेथे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले होते व ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे हे प्रमुख अतिथी होते. जर कोल्हापूरला ‘ऑनलाईन’ दीक्षांत समारंभ होऊ शकतो, तर नागपूरला का नाही, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहे.