नागपूर : ‘देशाच्या हृदयस्थानी असणाऱ्या नागपूर विद्यापीठाने आपल्या देदीप्यमान इतिहासात अनेक महापुरुषांना, महान व्यक्तिमत्त्वांना घडविले आहे. यापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची ओळख दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून सर्वत्र व्हावी, तसेच देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपूर विद्यापीठाने सक्षम भारताच्या उभारणीसाठी सहकार्य करावे,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राज्यपाल बाेलत होते. सुप्रसिध्द वैज्ञानिक व होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे होते.
१०० वर्षे एखादी संस्था विद्यादानाचे काम करते, हे अतिशय प्रेरणादायी आहे. या भूतकाळातून नव्या भविष्याचा आराखडा आम्हाला तयार करायचा आहे. या विद्यापीठातून देशाचा गौरव वाढवणारे नामवंत मंडळी तयार झाले आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असणारे नितीन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला घडविणारे हे ज्ञानपीठ असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
महाराष्ट्रातील विद्यापीठाची नावे संतांच्या नावाने असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आपण प्रयागमध्ये प्रत्यक्ष ऐकले होते, असे सांगत राष्ट्रसंतांच्या ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ या गीताचा उल्लेख करून संतांच्या दूरदृष्टीने कर्तृत्ववान पिढी निर्माण करण्याचे कार्य विद्यापीठाने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
संसदेच्या कामकाजामुळे उपस्थित न राहू शकलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आपला व्हिडिओ संदेश पाठविला. आपल्या जडणघडणीमध्ये नागपूर विद्यापीठाचे कार्य महत्त्वाचे असून, या ठिकाणी एक विद्यार्थी नेता म्हणून आपले करिअर घडल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठाच्या शतकोत्तर वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शताब्दी वर्षात विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविकेद्वारे दिली. प्र-कुलगुरू संजय दुबे यांनी आभार मानले.
मोदींमुळे जगात भारताचा गौरव वाढला, नागपूरचे गडकरी हे रोडकरी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गुणगाण केले. ते म्हणाले, पहिल्यांदा देशासाठी वीस-वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा, परंपरांना लोक नावं ठेवायची. मात्र, आज मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे. नितीन गडकरी हे नागपूर विद्यापीठाचेच विद्यार्थी. आज देशात गडकरी हे आपल्या कामामुळे रोडकरी म्हणून सन्मानाने ओळखले जातात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेवरील आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार केला.
विद्यापीठाने देश घडविण्याचे दायित्व व भूमिका घ्यावी - काकोडकर
ज्येष्ठ वैज्ञानिक होमी भाभा राष्ट्रीय संस्थाचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या भाषणात विद्यापीठांनी केवळ विद्यार्थीच घडवू नये, तर देश घडविण्याचे दायित्व व भूमिका आपल्याकडे घ्यावी, असे आवाहन केले.
उद्योजक पुरुषोत्तम अग्रवाल जीवन साधना पुरस्काराने सन्मानित
नागपूर विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘जीवन साधना पुरस्कार’ २००७ पासून सुरू करण्यात आला आहे. यावर्षीच्या जीवनसाधना पुरस्काराचे मानकरी जागतिक दर्जाचे उद्योजक पुरुषोत्तम अग्रवाल ठरले आहेत. नागपूर विद्यापीठातर्फे शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी त्यांच्या मानपत्राचे वाचन केले. अग्रवाल हे आपल्या उद्योग व्यवसायासोबतच समता फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असतात. नागपूर विद्यापीठाचे ते विद्यार्थी आहेत.