नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरातील सिंथेटिक ट्रॅकचा परिपूर्ण उपयोग करून उत्तम खेळाडू निर्माण करावे. त्याचप्रमाणे देशातील एक महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून विद्यापीठाने कार्य करावे, असे विचार भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पद्मश्री पी. टी. उषा यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या विविध क्रीडाविषयक उपक्रमांची माहिती देण्यासाठी आणि भारतीय खेळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्र विस्तारा संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी क्रीडा संचालक डॉ. शरद सूर्यवंशी व क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे वरिष्ठ सदस्य डॉ. धनंजय वेळुकर यांनी चंद्रपूर येथे प्रवासात असताना पी. टी. उषा यांची भेट घेतली.
भारतीय खेळ प्राधिकरणाने आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने विद्यापीठाचे २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी खेळाडू निवडीसाठी टॅलेंट सर्च "कीर्ती" या कार्यक्रमासाठी निवड केली आहे, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी पी. टी. उषा यांना दिली. डॉ. धनंजय वेळूकर यांनी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकचा उपयोग ॲथलेटिक्स खेळाचे एक्सलेन्स सेंटर म्हणून करण्यास्तव यासाठीचा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे पाठवीत आहोत, या संदर्भातली माहिती दिली.
विद्यापीठाच्या इंडोर स्टेडियमसाठी ४४.४४ कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. यामध्ये असलेल्या विविध क्रीडाविषयक सुविधा बाबतही सांगितले. त्यावर पी. टी. उषा यांनी या स्टेडियमचा उपयोग नियमित सरावासाठी खेळाडूंना व्हावा. स्पर्धात्मक उपयोगितेपेक्षा सरावासाठीच्या उपयोगिता विद्यापीठात निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.