लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून ऑनलाइन माध्यमातून परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे. ऑफलाइनच्या तुलनेत ऑनलाइन परीक्षांचा खर्च कमी आहे. मात्र, तरीही विद्यापीठाकडून अगोदर इतकेच परीक्षा शुल्क घेण्यात येत आहे. या संदर्भात काही सिनेट सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठाने परीक्षा शुल्कात कपात करावी, अशी मागणी आता विद्यार्थ्यांनंतर सिनेट सदस्यांकडूनही करण्यात येत आहे.
कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन माध्यमातून सुरू झाल्या. दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती खालावली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करत असताना, परीक्षा शुल्क भरणे कठीण होत आहे. विद्यापीठाचा परीक्षेवरील खर्च निम्म्याने कमी झाला आहे. उत्तरपत्रिका प्रकाशित करणे, मूल्यांकन, परीक्षा केंद्रांचा खर्च याचीदेखील बचत झाली आहे, शिवाय मूल्यांकनासाठी येणाऱ्या प्राध्यापकांना टीए, डीए देण्यात यायचा. तोही कमी झाला आहे. असे असताना पूर्ण परीक्षा शुल्क आकारणे चुकीचे आहे. या कठीण स्थितीत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता असताना, अशा प्रकारे शुल्क घेणे अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे. विद्यापीठाने नैतिक जबाबदारीचे पालन करत, परीक्षा शुल्कात कपात करावी, अशी मागणी सिनेट सदस्य अॅड.मनमोहन बाजपेयी यांनी केली आहे.