लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. याशिवाय या समारंभाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायाधीश व नामांकित वकीलदेखील उपस्थित राहतील. त्यामुळे यंदा विद्यापीठाने सुरक्षेवर जास्त भर दिला आहे. पोलिसांसमवेत विद्यापीठाचीदेखील कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था राहणार आहे. शिवाय अभ्यागतांना प्रवेश न देण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे सरन्यायाधीशांनी मान्य केल्यानंतर विद्यापीठाने तयारीला सुरुवात केली होती. सरन्यायाधीश हे स्वत: नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी होते. त्यामुळे या दीक्षांत समारंभाचे ‘याची देही, याची डोळा’ साक्षीदार होता व्हावे असा अनेकांचा मानस आहे. मात्र कविवर्य सुरेश भट सभागृहात १८ जानेवारी रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभाला अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. केवळ प्रवेशपत्रिका असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. अगोदर विद्यापीठाने ‘पासेस’ जारी करण्याचा विचार केला होता. मात्र शैक्षणिक व विधी क्षेत्रातील मान्यवर या समारंभाला उपस्थित राहणार असल्याने प्रवेशपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. या पत्रिका समारंभस्थळी आणणे अनिवार्य राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. व्यस्त वेळापत्रक असतानादेखील सरन्यायाधीशांनी वेळ दिली असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे दीक्षांत समारंभ लांबलचक चालणार नाही. यंदा कालावधीदेखील कमी करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.विद्यापीठाचीदेखील राहणार सुरक्षासरन्यायाधीश असल्यामुळे कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. सोबतच विद्यापीठातर्फेदेखील महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सची सुरक्षाव्यवस्था तैनात करण्याची तयारी आहे. यासंदर्भात सुरक्षा यंत्रणेशी अधिकाऱ्यांच्या बैठकादेखील सुरू आहेत.गुणवंतांच्या केवळ दोन नातेवाईकांनाच प्रवेशपदकप्राप्त विद्यार्थी तसेच ‘पीएचडी’ मिळणाऱ्या उमेदवारांसमवेत दोनहून जास्त नातेवाईक येत असतात. त्यामुळे दीक्षांत समारंभाच्या ठिकाणी गर्दी होते. परंतु यावेळी यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठातर्फे केवळ ‘पीएचडी’ मिळविणाऱ्या व पदकप्राप्त विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनाच किंवा दोन नातेवाईकांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांची व्यवस्था भट सभागृहातील ‘बाल्कनी’मध्ये करण्यात येईल. इतर नातेवाईकांना प्रवेश देण्यात येणार नाही.
नागपूर विद्यापीठ : दीक्षांत समारंभात राहणार सुरक्षेचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:19 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पोलिसांसमवेत विद्यापीठाचीदेखील कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था राहणार आहे. शिवाय अभ्यागतांना प्रवेश न देण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठळक मुद्देअभ्यागतांना ‘नो एन्ट्री’, कालावधीदेखील घटविला