लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - कोरोनाविरोधातील लढाईमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेदेखील पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाचे कामकाज बंद असले तरी प्रशासनातील शंभराहून अधिक शिक्षकेतर कर्मचारी समाजात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी झटत आहेत. शहरातील विविध स्वस्त धान्य दुकानांसमोर ते देखरेख करत असून गर्दी होऊ नये यावर त्यांचा भर आहे.विद्यापीठ प्रशासन व पदव्युत्तर विभागातील शंभराहून अधिक कर्मचारी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक गरीब अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या सुविधेसाठी सरकारकडून स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे तिथे गर्दी होत आहे. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या दुकानांसमोर देखरेख करणे, गर्दी होऊ न देणे तसेच धान्याचे नियमानुसार वितरण होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी हे शंभराहून अधिक कर्मचारी पार पाडत आहेत.याशिवाय या संकटाच्या काळात प्रशासनाच्या सहकार्यासाठी प्रशासनाची चारहून अधिक वाहने कामाला लावण्यात आली आहेत. पोलीस पेट्रोलिंग, जनजागृतीसाठी २४ मार्चपासून ही वाहने शासकीय सेवेत आहेत.एनएसएसचा असादेखील पुढाकारएकीकडे एनएसएसकडून कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज हजार गरजूंना भोजनांची पाकिटे वितरित करण्यात येत आहे. सोबतच दहा हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी आरोग्यसेतू अँप डाऊनलोड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी ते विविध वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती करत आहेत. पाच हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी घरीच मास्क तयार करुन ते पोलिसांना वितरित केले. वर्धा, गोंदिया, भंडारा, नागपूर या चार जिल्ह्यात एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रशासकीय यंत्रणा व पोलिसांसोबत कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँका, स्वस्त धान्य दुकाने इत्यादी ठिकाणी हजारो विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.