लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मोबाईल अॅप ऐवजी काॅम्प्युटर बेस ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी अंतिम निर्णय घेण्यासाठी एका टास्कफोर्सचे गठण केले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.
सूत्रांनुसार, टास्क फोर्समध्ये परीक्षा विभाग, वित्त विभाग, आयटी तज्ज्ञ, व्यवस्थापन व विद्वत परिषदेच्या सदस्यांचा समावेश आहे. हे सदस्य परीक्षेच्या आयोजनाबरोबरच त्यावर होणारा खर्च, परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था व उपलब्ध संसाधने, आदींची माहिती घेणार आहे. त्याची समीक्षा करून विद्यापीठाला अहवाल देणार आहे. अहवाल व शिफारसीच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कॉलेजकडून काॅम्प्युटरवर परीक्षा घेण्यासंदर्भात आवश्यक सुविधांची माहिती मागितली आहे. परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यानुसार यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, काॅम्प्युटरवर परीक्षा घेतल्यास विद्यापीठाचा मोठा खर्च येणार आहे. हा खर्च कसा कमी करता येईल, यावर विचार सुरू आहे.
यासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. प्रफुल्ल साबळे म्हणाले, अजूनही काहीही निश्चित नाही. त्यामुळे कुठलीही प्रतिक्रिया देणे योग्य नाही.