नागपूर : आजकाल ‘सोशल मीडिया’चाच सगळीकडे ‘ट्रेन्ड’ असल्याने देशातील अनेक विद्यापीठांकडून विविध ‘सोशल’ मााध्यमातून विद्यार्थी व इतर घटकांशी नियमितपणे संवाद साधला जातो. मात्र, शतकपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला संकेतस्थळच सांभाळणे जड जात असून ‘सोशल’ होण्यापासून ते कोसो दूर आहे. याच मुद्द्यावर परीक्षा भवनात दोन विद्यार्थ्यांमधील संवाद बरंच काही सांगून गेला.
विद्यार्थ्यांशी संबंधित माहिती वेळेवर ‘अपलोड’ न केल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करत परीक्षा भवनात जावे लागले. इतर विद्यापीठात असतो तर सोशल माध्यमांच्या मदतीने विचारणा करता आली असती; पण आपले विद्यापीठ तर जगाच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धाच करण्याच्या भूमिकेत नाही, असा विद्यार्थ्यांचा सूर होता.
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या अफगाणिस्तानातील विद्यापीठेदेखील नियमितपणे ‘सोशल’ माध्यमांवरून विद्यार्थ्यांना माहिती कळवतात. अशा स्थितीत नागपूर विद्यापीठापेक्षा अफगाणिस्तानातील विद्यापीठे तरी बरी म्हणायची काय, हा विद्यार्थ्यांचा सवाल प्रशासनाच्या डाेळ्यांत अंजन घालणारा होता.