नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सोमवार १८ मार्च पासून सुरू होत आहे. ५ ते ६ टप्प्यात विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे ११०० पेक्षा अधिक उन्हाळी परीक्षांचे नियोजन परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे. उन्हाळी २०२४ परीक्षेच्या नियोजनाचा आढावा प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी शुक्रवार आयोजित बैठकीत घेतला.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, उपकुलसचिव नवीन मुंगळे, मोतीराम तडस, नितीन कडबे, डी. एस. पवार उपस्थित होते. उन्हाळी २०२४ परीक्षेकरिता एकूण १३३ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर शहर ३५, नागपूर ग्रामीण ३६, भंडारा जिल्ह्यात २०, गोंदिया जिल्ह्यात १७ तर वर्धा जिल्ह्यात २५ केंद्र राहणार आहे. प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा सोमवार दिनांक १८ मार्चपासून सुरू होत आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २६ मार्चपासून, पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा ८ एप्रिल तर पुरवणी परीक्षा १५ एप्रिल पासून सुरू होत असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल साबळे यांनी दिली. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा मे च्या अंतिम आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना प्र-कुलगुरु डॉ. दुधे यांनी बैठकीत दिल्या.