नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या ऑफलाईनच होतील, असे स्पष्ट संकेत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिले आहेत. यासोबतच परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. याअंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा या ८ जूनपासून सुरू होतील, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून सुरू होतील. प्रथम व शेवटचे वर्ष सोडून सर्व सेमिस्टरच्या परीक्षा २२ जूनपासून सुरु होतील. विद्यापीठाला जुलै महिन्यापर्यंत सर्व परीक्षा घ्यावयाच्या आहेत.
परीक्षांच्या तारखांबाबत बुधवारी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी एक अधिसूचना जारी केली आहे. परंतु या अधिसूचनेत परीक्षा या ऑफलाईन होणार की ऑनलाईन, हे स्पष्ट केलेले नाही. मात्र परीक्षा या २५ एप्रिल २०२२ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुुरूंसोबत झालेल्या बैठकीत सांगितल्यानुसार होतील. तसेच लेखी परीक्षेचे वेळापत्रक नंतर जारी केले जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. या दोन्ही संकेताच्या माध्यमातून परीक्षा या ऑफलाईन घेण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षा ऑफलाईन घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार तयारी सुरू झाली आहे. आता केवळ विद्यार्थी संघटना विशेषत: सत्ताधारी पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांकडून काही गोंधळ होऊ नये, याची चिंता विभागाला लागली आहे.
कुलगुरूंच्या बैठकीत झाला होता निर्णय
डॉ. साबळे यांनी अधिसूचनेत ज्या बैठकीचा उल्लेख केला आहे, त्या बैठकीत परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला होता. परीक्षेत विद्यार्थ्यांना १५ मिनिट अतिरिक्त देण्याचा निर्णयसुद्धा झाला होता. तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा सारख्याच असाव्यात, असाही निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे.