लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नाव घेतले की अनेकांच्या डोक्यावर आठ्या पडतात. या विभागाबाबत अनेकांचा तक्रारीचाच सूर असतो. कुणी अधिकारी तर कुणी कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर नाराज असतो. मात्र शुक्रवारी जागतिक महिला दिनी ‘पीएचडी सेल’ने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. विभागातील महिला कर्मचारी तसेच तेथे कामाने आलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. नियोजनानुसार अगोदर केवळ पुष्पा लामसुरे व माया गोस्वामी यांचाच सत्कार होणार होता. मात्र त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक महिलेचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे कुठलेही औपचारिक आयोजन नव्हते, मात्र सत्कारामुळे येणारी प्रत्येक विद्यार्थिनी भारावून जात होती. महिला कर्मचारीदेखील अतिशय आनंदी झाल्या होत्या. इतक्या वर्षांत प्रथमच त्यांचा दिनविशेषानिमित्त सत्कार झाला होता. विभागाचे सहायक कुलसचिव बिंदुप्रसाद शुक्ला यांच्या पुढाकारातून ही संकल्पना राबविण्यात आली. या आयोजनामागे कुठलाही उद्देश नव्हता. केवळ एक परंपरा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला कर्मचारी व विद्यार्थ्यांना यातून प्रोत्साहन मिळेल व त्यादेखील ही परंपरा सुरू ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.