लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यानंतर २४ तासाच्या आत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रशासकीय बदल झाले आहेत. प्रभारी कुलसचिव डॉ. विनायक देशपांडे यांना कार्यकारी प्र-कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर ‘एलआयटी’तील प्रोफेसर डॉ. नीरज खटी यांची परत एकदा प्रशासनात ‘एन्ट्री’ झाली असून त्यांच्याकडे कुलसचिवपदाचा प्रभार देण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपल्या अधिकारात या नियुक्त्या केल्या आहेत.नवीन विद्यापीठ कायद्यानुसार प्र-कुलगुरूंकडे मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रमोद येवले यांच्यानंतरदेखील प्रशासनाची गाडी सुरळीत चालावी यासाठी तातडीने प्र-कुलगुरुंची नेमणूक करणे आवश्यक होते. दुपारी विद्यापीठात कुलगुरूंनी विविध अधिकारी तसेच ज्येष्ठ प्राध्यापकांशी चर्चा केली. सायंकाळी विद्यापीठाचे कामकाज बंद होण्याच्या वेळेवर अचानकपणे ही घोषणा करण्यात आली.डॉ. विनायक देशपांडे हे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठातादेखील होते. एकाचवेळी दोन मोठ्या जबाबदाºया सांभाळण्यात अडचण येईल ही बाब लक्षात घेऊन कुलगुरूंनी व्यवसाय व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. अनंत देशमुख यांच्याकडे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठातापदाचा प्रभार सोपविला आहे. सायंकाळी ६.३० वाजता डॉ. देशपांडे यांनी कार्यकारी प्र-कुलगुरूपदाचा प्रभार स्वीकारला. यावेळी कुलगुरुंसमवेत वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अनिल हिरेखण, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.गोवर्धन खडेकर होते.खटींवर परत एकदा विश्वासडॉ. नीरज खटी यांनी विद्यापीठात परीक्षा व मूल्यमापन संचालक म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांच्याकडे बरेच महिने प्रभारी कुलसचिवपदाचा प्रभारदेखील होता. मात्र ‘एलआयटी’मध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांची प्रशासकीय कार्यशैली लक्षात घेता कुलगुरुंनी परत एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला व प्रभारी कुलसचिवपदाची परत एकदा जबाबदारी दिली. सध्या खटी यांचा ‘एलआयटी’मध्ये ‘प्रोबेशन’ काळ सुरू असला तरी नियमांनुसार त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार कुलगुरूंना आहे, अशी बाब माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड यांनी स्पष्ट केली.देशपांडे यांना प्रदीर्घ अनुभवडॉ. देशपांडे हे नागपूर विद्यापीठाशी गेल्या ३२ वर्षांपासून जुळलेले आहेत. २००९ सालापासून व्यवसाय व्यवस्थापन विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. याशिवाय प्रभारी कुलगुरू, प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, ‘अॅकेडॅमिक स्टाफ कॉलेज’चे सहायक संचालक म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. विद्यापीठाची विधीसभा, व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणांचेदेखील ते सदस्य राहिले आहेत.