लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या हिवाळी परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने शुक्रवारी अधिकृत घोषणा केली. कोरोनाची स्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्याबाबत महाविद्यालये, विद्यार्थी तसेच प्राधिकरण सदस्यांकडून वारंवार मागणी होत होती. परंतु २४ मेपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी परीक्षांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
अभियांत्रिकीसह विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम व तृतीय सत्राच्या हिवाळी परीक्षा शिल्लक आहेत. अनेक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे व देणे यात अडचणी येत आहेत. हीच बाब लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या या मागणीने जोर धरला होता. प्राचार्य फोरमनेदेखील यासंदर्भात विद्यापीठाकडे निवेदन सादर केले होते. प्राधिकरण सदस्यांनीदेखील कुलगुरूंकडे हा मुद्दा लावून धरला होता.
अखेर विद्यापीठाने शुक्रवारी दुपारी परिपत्रक जारी करत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली. यानुसार सर्व ऑनलाईन परीक्षा पुढील घोषणेपर्यंत समोर ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयांनी ऑनलाईन माध्यमातून घ्याव्या, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
या अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
- बी.ई. प्रथम सत्र
- बी.टेक. प्रथम सत्र केमिकल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी
- बी.फार्म प्रथम सत्र
- बी.ई.तृतीय सत्र (पदविकाप्राप्त विद्यार्थी)
- बी.टेक. तृतीय सत्र केमिकल इंजिनिअरिंग (पदविकाप्राप्त विद्यार्थी)
- बी.फार्म. तृतीय सत्र (पदविकाप्राप्त विद्यार्थी)
- बी.एच.एम.सी.टी. प्रथम सत्र
- एलएलबी (तीन वर्षे) प्रथम सत्र
- बीए-एलएलबी (पाच वर्षे) प्रथम सत्र
प्रात्यक्षिक परीक्षा ३१ मेपर्यंत घेण्यास मुभा
पदव्युत्तर, पदवी, पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या नियमित, बहिःशाल व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर ५ ते १५ मेदरम्यान घ्यायच्या होत्या. या परीक्षा आता ३१ मेपर्यंत ऑनलाईन माध्यमातून घेता येणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत बोलवू नये असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले आहे.
पेटसाठी नोंदणी करण्याची आज अखेरची संधी
पेटच्या वेळापत्रकातदेखील विद्यापीठाने बदल केला आहे. पेटसाठी ८ मेपर्यंत नोंदणी करता येणार असून हार्डकॉपी १५ मेपर्यंत विद्यापीठात सादर करता येऊ शकतील. पेटच्या तारखांची घोषणा नंतर करण्यात येईल.