आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची उत्तरपत्रिका मूल्यांकन प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली आहे. सामान्यत: उन्हाळी व हिवाळी परीक्षेच्या निकालानंतर फेरमूल्यांकनात विद्यार्थ्यांचे गुण वाढण्याची शक्यता फार कमी असते. परंतु, गेल्या दोन वर्षापासून फेरमूल्यांकनात विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाट वाढ होत आहे. तसेच, फेरमूल्यांकनासाठी अर्ज करणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणेही संशयाला बळ देत आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या हिवाळी परीक्षेतील फेरमूल्यांकनात विद्यार्थ्यांचे १० ते २३ पर्यंत गुण वाढले. अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, विधी यासह अन्य काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचे गुण सर्वाधिक वाढले.उल्लेखनीय बाब म्हणजे, परीक्षा उत्तीर्ण व अनुत्तीर्ण या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण वाढले. यामागे काय कारण आहे, याची विचारणा परीक्षा विभागाचे अधिकाऱ्यांना केली असता कुणीच उत्तर दिले नाही.सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तरपत्रिका मूल्यांकनात अक्षम्य निष्काळजीपणा केला जातो. मूल्यांकनासाठी पात्र व अनुभवी शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. परंतु, गेल्या दोन वर्षापासून काही अभ्यासक्रम सोडल्यास बहुतांश अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अपात्र व अनुभवहीन शिक्षक, अंशकालीन शिक्षक व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात आहे.घाईगडबडीने मूल्यांकन संपविण्याच्या प्रयत्नामध्ये उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने तपासल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले किंवा त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. परिणामी, त्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यानंतर त्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली.
कुणाचेच लक्ष नाहीसूत्रांनी सांगितले की, परीक्षा विभाग व परीक्षा कार्याबाबत प्रचंड उदासीनता आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील गोंधळासह उत्तरपत्रिका मूल्यांकनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु, कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. चार स्क्रूटिनियरवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते, पण त्यात पुढे काहीच झाले नाही.