योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील तीन वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्सप्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे. २०१५ च्या तुलनेत आता सरासरी १९ दिवसांच्या अगोदर निकाल जाहीर होत आहेत. २०२४ पर्यंत परीक्षा झाल्यानंतर ३१ दिवसांतच निकाल लावण्याचे ‘टार्गेट’ विद्यापीठाने समोर ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.एकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संथ निकालांमुळे विद्यार्थ्यांचे मोर्चांवर मोर्चे यायचे. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल साधारणत: आॅगस्ट, सप्टेंबरपर्यंत लागायचे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागायचा. २०१४ साली तर ४६ टक्के निकाल ४५ दिवस उलटून गेल्यानंतर लागले होते. २०१५ साली गैरव्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल हे सरासरी ५०.८८ दिवस तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल ५०.४३ दिवसांनी जाहीर झाले होते. मात्र त्यानंतर परीक्षा विभागाने कात टाकण्यास सुरुवात केली. विद्यापीठातील बहुसंख्य परीक्षांचे मूल्यांकन ’आॅनलाईन’ करण्यात आले. शिवाय परीक्षा प्रणालीत अनेक सुधारणा करुन निकालांचा वेग कसा वाढविता येईल, याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सातत्याने प्रत्येक वर्षी निकालांचा वेग वाढत गेला. २०१४ मध्ये अवघ्या २६ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले होते. २०१५ मध्ये हाच आकडा ३४.५३ टक्के इतका होता. २०१६ मध्ये निकालांचा वेग वाढला व ५०.८३ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले. २०१७ मध्ये ७०.३२ टक्के निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले. २०१८ च्या उन्हाळी परीक्षात तर गैरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.४३ दिवस तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.२२ दिवसात जाहीर झाले.
२०१४ पर्यंत ३१ दिवसांचे ‘टार्गेट’४नागपूर विद्यापीठाच्या निकालांच्या ‘पॅटर्न’चा राज्यातील व राज्याबाहेरील विद्यापीठांनीदेखील अभ्यास केला. निकालांचा हा वेग कायम राहावाल यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात यासंदर्भात ‘टार्गेट’देखील ठरविण्यात आले आहेत. सर्व परीक्षांचे निकाल सरासरी ३१ दिवसांत जाहीर झाले पाहिजे, यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे.
निकालांचा वेग वाढण्याची कारणे
- ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन
- मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना येणे अनिवार्य
- महाविद्यालयांसमवेत समन्वय
- तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे धोरण