लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २४ मार्च रोजी असून यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. याचा फटका उन्हाळी परीक्षांना बसला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या ११८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रकाप्रमाणे आता या परीक्षा ८ एप्रिल रोजी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी दिली आहे.नियोजित वेळापत्रकाप्रमाणे नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या दुसऱ्या टप्प्याला २४ मार्चपासून सुरुवात होणार होती. परंतु याच दिवशी १०५ वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यामुळे नियमानुसार दीक्षांत समारंभाच्या दिवशी कुठलीही परीक्षा आयोजित करण्यात येत नाही. कुठलाही विद्यार्थी समारंभापासून वंचित राहू नये हे यामागील कारण आहे. परंतु १०५ व्या दीक्षांत समारंभाच्या तारखेची घोषणा परीक्षा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर करण्यात आली. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे. तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे सांगण्यात आले आहे.हे आहेत प्रमुख अभ्यासक्रम२४ मार्च रोजीच्या ‘पोस्टपोन करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये ‘एमए’ तृतीय सत्र, एमकॉम पहिले सत्र, बीए प्रथम सत्र, बीए द्वितीय वर्ष, ‘बीएसस्सी’ (गृहविज्ञान) प्रथम सत्र, बीकॉम अंतिम वर्ष, ‘बीएसस्सी’ प्रथम सत्र, ‘एमएसस्सी’ प्रथम सत्र, बीसीए अंतिम वर्ष, बीसीए प्रथम सत्र, एमसीएम प्रथम सत्र, एलएलएम तृतीय सत्र यांचा प्रामुख्याने समावेश आहे.संकेतस्थळावर सूचनाच नाहीहजारो विद्यार्थी या परीक्षांत सहभागी होणार आहेत. परंतु नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांना याची माहितीच नव्हती. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरदेखील अधिसूचना ‘अपलोड’ करण्यात आली नव्हती.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ‘पोस्टपोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 8:54 PM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २४ मार्च रोजी असून यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. याचा फटका उन्हाळी परीक्षांना बसला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या ११८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्दे२४ मार्चच्या परीक्षा आता ८ एप्रिल : दीक्षांत समारंभामुळे घेतला निर्णय