लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनचे आदेश जारी करण्यात आले होते. परंतु कोरोना संक्रमणाचा धोका अजूनही कायम असल्याने शिथिलतेसह निर्बंध सोमवार २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत लागू राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. आधी जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला दुपारी १ पर्यंत मुभा होती. नवीन आदेशात काही बदल व शिथिलता देण्यात आली आहे. सायंकाळी ४ पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवता येतील. तसेच रेस्टाॅरंट, हॉटेल, खाद्यगृह ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ७ पर्यंत, होम डिलिव्हरीसाठी रात्री ११ पर्यंत किचन सुरू ठेवता येतील.
दूध दुकाने, डेअरी सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. यामुळे व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्याचे अधिकार मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे सहायक आयुक्त, त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे मनपा अधिकारी, सर्व संबंधित पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
..............
हे राहणार बंद
- धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद मात्र नियमित पूजाअर्चेसार्ठी ५ लोकांना परवानगी.
- धार्मिक व राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम.
- सभागृह, मंगल कार्यालये, लॉनमधील लग्नसमारंभ.
- शहरातील उद्याने
- शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था
- सर्व आठवडी बाजार
- जलतरण तलाव, व्यायामशाळा, जिम
- मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे
...
हे राहणार सुरू
- अत्यावश्यक सेवा
- शहरातील सर्व दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू.
-रेस्टाॅरंट, हॉटेल, खाद्यगृहे ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ७ पर्यंत.
- दूध दुकाने, डेअरी सायंकाळी ७ पर्यंत.
- प्रवासी वाहतूक सेवा (५० टक्के क्षमतेने)
- कळमना व महात्मा फुले मार्केट (वेळेचे बंधन नाही)
-चारचाकी वाहन १ अधिक २ प्रवासी, दुचाकीवर डबलसीट
- वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स
- निवासी हॉटेल्स, लॉज (५० टक्के क्षमतेने)
-- बांधकामे, उद्योग, कारखाने
- बँक, पोस्ट, विमा, विद्युत, शीतगृह
- शासकीय व निमशासकीय व खासगी कार्यालये क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीत.
-वाचनालये, अभ्यासिका ५० टक्के क्षमतेने.