नागपूर – विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. काँग्रेसनं ऐनवेळी उमेदवार बदलत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर काँग्रेस उमेदवार रविंद भोयर यांना या निवडणुकीत १ मत पडली. बावनकुळे यांना ३६२ मते पडली असून या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल ४९ मतं फोडण्यात भाजपाला यश आलं आहे.
या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना विजयी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपाने उमेदवारी दिली म्हणून मी पक्षाचे आभार मानतो. ज्या कामासाठी मला उमेदवारी मिळाली त्या सर्व अपेक्षा पूर्ण करू. काँग्रेसचे नियोजन नव्हते. नाना पटोले व इतर नेत्यांच्या हुकूमशाही धोरणामुळे काँग्रेसचे मतदार नाराज होते. काँग्रेसला खिंडार पडले. काँग्रेस नेत्यांनी केवळ बाता मारल्या. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केले.
असा झाला विजय
भाजपाचे चंद्रशेखन बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांना ३६२ मते मिळाली तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. चंद्रशेखर बावनकुळे यांचा १७६ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत एकूण ५५९ मते होती. त्यातील ५ जणांनी मतदान केले नाही. ५५४ जणांपैकी ३६२ मतं भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पारड्यात पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाकडे केवळ ३२५ हक्काची मते होती. त्यातील एकही मत फुटू नये म्हणून भाजपानं मतदारांना पर्यटनासाठी पाठवलं होतं. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, छोटू भोयर १ आणि मंगशे देशमुख यांना १८६ मते मिळाली.
काँग्रेसमध्ये पोलिटिकल ड्रामा
काँग्रेसने भाजपामधून आयात केलेले नगरसेवक रविंद्र उर्फ छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने उमेदवारच बदलला. गुरुवारी सायंकाळी प्रदेश काँग्रेसकडून पत्र जारी करीत भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन जाहीर करण्यात आले होते. विशेष म्हणजे रविंद्र भोयर यांनी लढण्यासाठी असमर्थता व्यक्त केल्याचे कारण प्रदेश काँग्रेसकडून जारी केलेल्या पत्रात देण्यात आले. छोटू भोयर यांनी मात्र आपण असमर्थता व्यक्त केली नसल्याचे स्पष्ट करीत पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट केले होते.
संबंधित बातम्या
नागपूर विधान परिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंचा एकतर्फी विजय, महाविकास आघाडीला धक्का
नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाची यशस्वी खेळी; महाविकास आघाडीची ४९ मतं फुटली