नागपूर - १७ मार्च रोजी नागपूरात भडकलेल्या हिंसाचारामागे मास्टरमाईंड असलेल्या फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या पोलीस तपासात बांगलादेश आणि काश्मीर पॅटर्नची मोठी माहिती समोर आली आहे. माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम खान काही महिन्यांपूर्वी मालेगावला आला होता. त्याशिवाय तो सैयद असीम अलीच्या संपर्कात असल्याचेही तपासात पुढे आले आहे. यानंतर सैयद अलीही पोलिसांच्या रडारवर आला आहे.
सैयद असीम अली याला यूपीच्या कमलेश तिवारी हत्याकांडात अटक करण्यात आली होती. नागपूर हिंसाचारात त्याचे नाव समोर आल्यानंतर आता एनआयएची एन्ट्री होऊ शकते. सैयद असीम अली याला नागपूर दंगलीतील दुसरा मास्टरमाईंड मानलं जात आहे. नागपूर दंगलीमागे बांगलादेशच नव्हे तर काश्मीर पॅटर्नची चर्चा होत आहे. नागपूरच्या महाल परिसरात संध्याकाळी भीषण दंगल भडकवण्यात आली. त्यात ३५ पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेत एका डीसीपी अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला.
या दंगलीच्या तपासात फहीम खानने दिलेल्या चिथावणीखोर भाषणामुळे जमाव जमल्याचा आरोप आहे. अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटकांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांचीही छेड काढली. शुक्रवारी फहीम खानसह इतरांना कोर्टात हजर केले तेव्हा त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. पोलीस फहीम खानचं नेटवर्क शोधत आहे. ज्याप्रकारे काश्मीरात दगडफेक करण्यासाठी भाड्याने लोक आणली जातात तेच नागपूर दंगलीत करण्यात आले. तपासात फहीम खानचे धागेदोरे सैयद असीम अलीशी जुळले आहेत.
कोण आहे सैयद अली?
नागपूरच्या झिंगाबाई टाकली परिसरात राहणारा सैयद माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी आहे. तो आधी युट्यूब चॅनेल चालवत होता. सैयद अली ओरंगजेबाचा कट्टर समर्थक मानला जातो. २०१५ साली उत्तर प्रदेशातील हिंदू नेता कमलेश तिवारी यांनी पैंगबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले तेव्हा अलीने कमलेश तिवारीची जीभ हासडू असा इशारा दिला. त्यानंतर काही दिवसांत लखनौ येथे कमलेश तिवारी यांची हत्या झाली होती. या प्रकरणात २०२४ पर्यंत तो जेलमध्ये होता. त्यानंतर जुलै २०२४ साली सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन दिला. कमलेश तिवारीच्या मारेकऱ्यांनी असीमला फोन केला होता हे सिद्ध झाले होते.
फहीमचं मालेगाव कनेक्शन
नागपूर दंगलीतील मास्टरमाईंड फहीम खानचं मालेगाव कनेक्शनही उघड झाले आहे. तो ५ महिन्यापूर्वी मालेगावला गेला होता. फहीम खानचा फोटो व्हायरल झाला आहे. विधानसभा निवडणुकीत त्याने माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचे कार्यालय उद्घाटन केले होते. फहीमला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.