नागपूर : विश्वजित कदम यांच्याकडून संजय राऊत यांची हायकमांडकडे तक्रार
By कमलेश वानखेडे | Published: April 6, 2024 03:36 PM2024-04-06T15:36:51+5:302024-04-06T15:39:19+5:30
नागपुरात रमेश चेन्नीथला व मुकुल वासनिक यांची घेतली भेट
नागपूर : सांगलीमध्ये उद्धवसेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. यावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. उद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केलेली टीका काँग्रेस नेते आ. विश्वजित कदम यांच्या जिव्हारी लागली आहे. कदम यांनी शनिवारी दुपारी नागपुरात दाखल होत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व अ.भा. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांची भेट घेतली व संजय राऊत यांची तक्रार केली.
कदम यांच्यासोबत विशाल पाटील हे देखील होते. या बैठकीत तब्बल ३५ मिनिटे सांगलीच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर चर्चा झाली. सांगलीतील तासगावमध्ये आयोजित मेळाव्यात संजय राऊत यांनी तुमची नौटंकी बंद करा आणि सामील व्हा, असे वक्तव्य केले. यावर कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही संयम ठेवून आहोत, राऊत यांच्यापेक्षा जास्त कटू आम्हालाही बोलता येईल, मग आम्हाला परवानगी देता का, अशी विचारणा त्यांनी चेन्नीथला यांच्याकडे केली. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्यास आम्ही इच्छुक आहेत, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली. चेन्नीथला व वासनिक यांनी कदम यांचे म्हणणे ऐकूण घेतले व या घटनाक्रमाचा सविस्तर अहवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पाठविला जाईल, असे स्पष्ट केले.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले, सांगलीच्या जागेवरून असलेला संभ्रम आम्ही लवकर दूर करू. कदम यांच्या मागणीवर आम्ही विचार करू. चर्चा करून यावर तोडगा काढू. उद्धव सेनेने पत्र काढले असले तरी काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल त्याचे पालन सगळ्यांनी केले पाहिजे, असेही ते म्हणाले. विश्वजित कदम म्हणाले, सांगलीबाबत नाना पटोले यांनी केलेली भावना ही कार्यकर्त्याची भावना आहे. शुक्रवारी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. आज महाराष्ट्र प्रभारी यांची भेट घेतली. काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडीत एकत्रितपणे सांगेल ते आम्हाला मान्य असेल.
धाडस असेल तर नाव घेऊन बोला : विश्वजित कदम
संजय राउत हे कुणाच्या बाबतीत बोलत आहे ते मला माहित नाही. त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, असे आव्हान विश्वजित कदम यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिले. सांगलीच्या राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहित आहे, तो कुठलाही व्यक्ती की सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे. आमची संघटना मजबूत आहे. व्यक्तिगत आरोप लावणे योग्य नाही. राऊत हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असे वक्तव्य करण्याची गरज नाही. आम्ही पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने सांगलीची जागा मागत आहोत. आम्ही संयमाने वागत आहोत. मात्र आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असा इशाराही कदम यांनी दिला.