नागपूर : उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताला हादरवून सोडणाऱ्या क्रूरकर्मा विवेक पालटकर याच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. १० जून २०१८ साली पालटकरच्या डोक्यात अक्षरश: सैतान शिरला होता व त्याने स्वत:ची सख्खी बहीण, जावई, भाची, बहिणीची सासू व स्वत:च्या मुलाचा अगदी ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’च केला होता. पालटकर याला फाशी झाली असली तरी त्याच्या कृत्याची शिक्षा दोन लहान मुलींना आयुष्यभर भोगावी लागणार आहे. त्याची मुलगी व भाची त्या काळरात्री क्रूरकर्म्याच्या तावडीतून सुटल्या होत्या. मात्र त्यांच्या आयुष्यात नेहमीसाठीच ग्रहण लागले आहे.
मौदा तालुक्यातील नवरगावमधील गुलाब पालटकर यांना दोन पत्नी होत्या. त्यातील संध्या नामक पत्नीला विवेक आणि अर्चना ही दोन मुलं होती. गुलाब पालटकर यांच्याकडे १० एकर शेती होती. त्यातील सव्वादोन एकर शेती त्यांनी दुसऱ्या पत्नीच्या मुलीच्या नावे केली होती. उर्वरित साडेसात एकरवर नराधम विवेकचा ताबा होता. २०१४ मध्ये त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे तो कारागृहात पोहचला. कारागृहातदेखील त्याच्या डोक्यात सैतानी विचारच असायचे. पवनकर यांच्याशी शेतीवरून वाद सुरू असताना त्याने त्यांच्या घरापासून काही अंतरावरच एक भाड्याचे घर घेतले. पवनकर यांना संपविण्यासाठी १० जून रोजी पहाटे तीन वाजता तो त्यांच्या घरी पोहोचला आणि सर्व जण गाढ झोपेत असतानाच डोक्यावर सब्बलीने वार केले.
सब्बल आडवी मारल्याने त्याचा प्रहार त्याचाच मुलगा कृष्णा व भाची वेदांतीच्या डोक्यावरदेखील झाले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून बहीण अर्चना व सासू मीराबाई जागे झाले. त्यांच्या डोक्यावरदेखील विवेकने सब्बलचे प्रहार करत त्यांची हत्या केली होती. विवेकची मुलगी वैष्णवी व कमलाकरची मुलगी मिताली दुसऱ्या खोलीत झोपल्याने वाचल्या होत्या. मात्र त्या काळरात्रीनंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. एका रात्रीत त्यांचे कुटुंब त्यांच्यापासून हिरावल्या गेले. या घटनेच्या जखमा आजही त्यांच्या मनात कायम आहेत.
ज्याने आधार दिला, त्यालाच संपविलेविवेक कारागृहात असताना त्याचे जावई कमलाकर पवनकर यांनीच शेती व त्याच्या मुलामुलीचा सांभाळ केला होता. वैष्णवी व कृष्णा यांच्यावर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. विवेकला कारागृहातून बाहेर आणण्यातदेखील पवनकर यांची मौलिक भूमिका होती. मात्र विवेकला याची कुठलीही कदर नव्हती. शेतीसह मुलांचा ताबा मिळावा यासाठी बाहेर आल्यावर त्याने वाद घालायला सुरुवात केली होती. विवेकची वृत्ती जाणून असल्याने पवनकर यांनी अगोदर नोकरी मिळव असा सल्ला दिला होता. विवेकने जबरदस्तीने शेतीचा ताबा घेतला. त्यामुळे पवनकर दुखावले गेले होते व त्यांनी त्याला सुटकेसाठी खर्च केलेले पैसे मागितले. येथूनच विवेकचे डोके फिरले व त्याने पवनकर यांची हत्या करण्याचे षडयंत्र रचले होते.
नागपुरातून गाठली दिल्ली, लुधियाना, मुंबई, पंजाबअंगाचा थरकाप उडेल असे हत्याकांड घडवून आणल्यानंतर विवेकने घर गाठले व तेथून सकाळी ९ वाजता रेल्वेने दिल्लीकडे निघाला. तेथून त्याने लुधियाना गाठले व सैनीवाल भागातील इंडस्ट्री परिसरात मजुरी सुरू केली. बारावीनंतर त्याने आयटीआयचा अभ्यासक्रम केला होता. त्याच्या भरवशावर त्याने मुंबईतील एका टेक्सटाईल कंपनीत नोकरी सुरू केली. नऊ महिन्यांनी पंजाबमधील अंबालातील टेक्सटाईल कंपनीत नोकरी लागला. इतके मोठे हत्याकांड केल्यानंतरदेखील तो साळसूदपणाचा आव आणत जगत होता.