नागपूर : ‘का म्हणते गा भाऊ थंडी?’ ‘का सांगू गा भाऊ, हाडं गाेठून रायले न.’ एकमेकांना भेटणाऱ्या नागपूरकरांचा संवाद सुरू हाेण्यापूर्वी या प्रश्नाेत्तरांची देवाण-घेवाण हाेत आहे. कारण मागील चार दिवसांपासून गाेठवणाऱ्या थंडीमुळे ‘यावर्षी हवी तशी थंडी वाटली नाही’ म्हणणाऱ्या नागपूरकरांची ‘दातखिळी’ बसली आहे.
तशी नागपूरकरांची ‘मिजास’ काही कमी नाही. पुणेकरांच्या ताेडीस ताेड, ‘थंडीत अन् उन्हाळ्यात येजाे’, असे उत्तर हमखास ठेवलेले. यावर्षी थंडीने जरा निराशच केले. जेमतेम काही दिवस वगळता हिवाळा संपायला आला तरी थंडीचा प्रकाेप जाणवला नाही. त्याऐवजी पावसानेच जाेर धरला हाेता. मात्र, २३ जानेवारीपासून वातावरणाने कूस बदलली. हवामान खात्यानेही थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविला हाेता. २४ ला गारवा वाढला आणि २५ जानेवारीला पारा सर्रकन खाली घसरला आणि नागपूरकरांना गारठा झाेंबला. २६, २७ आणि २८ जानेवारीला ८.४ अंशावर जाऊन कडाक्याने तर कहरच केला. शनिवारी तर पारा पुन्हा घसरून ७.६ अंशावर पडला आणि शरीरात बर्फ पडल्यागत झाले.
थंडी सुरू झाली की, रात्री शेकाेटी पेटणार नाही तर नवलच. स्वच्छतेची आवड म्हणून नाही तर हुडहुडी घालविण्यासाठी आसपासचा कचरा गाेळा करून जागाेजागी रात्री शेकाेटी पेटती दिसायची. यावर्षी तेही कमीच दिसले. मात्र, तडाखा वाढताच शेकाेट्याही पेटायला लागल्या आहेत. आतापर्यंत लाेक स्वेटर, जॅकेट असे उबदार कपड्यांकडे दुर्लक्ष करून हाेते, पण तीन दिवसांपासून उबदार कपडे दिवसाही जवळ करू लागले. तरीही हात बांधून ‘हु..हु..हू..हू...’ करणाऱ्यांकडे पाहून थंडी वाढल्याची जाणीव हाेते. सायंकाळचे ५ वाजले की, ‘कधी एकदा घरी जाऊन ब्लॅन्केट अंगावर घेताे’, असे झाले आहे. घरीही अंगावर गाेधडी घेऊन राहण्याशिवाय पर्याय नाही. असेच ब्लॅंकेटमध्ये शिरून राहावे, अशी प्रत्येकाची भावना झाली आहे.
पांघरुणातून निघण्याची इच्छाच होत नाही
सध्या घरोघरी थंडीचीच चर्चा आहे. सकाळ झाली तरी पांघरूणातून निघण्याची इच्छा हाेत नाही आणि निघाले तरी सूर्याचा आसरा घ्यावा लागताे. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेण्याचा आनंद आता हवाहवासा झाला आहे. नव्हे, दिवसभर उन्हातच राहावे, असे नागपूरकरांना वाटत आहे. गारठवणाऱ्या या थंडीने नागपूरकरांना सुखावले आहे. मात्रल थंडी वाढताच सर्दी, खाेकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून काेराेनाच्या नव्या ओमायक्रान रूपाने धडकीही भरवली आहे.