नागपूर : दिल्लीप्रमाणे नागपूरचेहीप्रदूषण वाढले, याबाबत ‘लाेकमत’ने वारंवार अधाेरेखित केले आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या आकडेवारीतून हा धाेका समाेर येताे. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जानेवारी महिन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. महिन्याचे सर्वच्या सर्व ३१ दिवस नागपूरची हवा प्रदूषित हाेती. यातले केवळ दाेन दिवस शुद्ध हवेचा स्तर समाधानकारक हाेता.
सर्व ऋतूंमध्ये हिवाळ्यातील थंडीचा काळ आराेग्यदायी म्हणून गणला जाताे. ‘ग्रीन सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपुरात तर दिवाळी वगळता थंडीच्या काळात हवा प्रदूषित झाली नाही. मात्र, हिरवे शहर म्हणून ओळखही पुसत चालली आणि प्रदूषणातही वाढ हाेत आहे. हिवाळ्याच्या तिन्ही महिन्यांत प्रदूषणचा निर्देशांक वाढलेला दिसून आला आणि शुद्ध हवेचे दिवस घटत चालल्याचे दिसून आले. नाेव्हेंबरमध्ये ३० पैकी २८ दिवस प्रदूषणात गेले आणि डिसेंबरचे ३१ पैकी ३० दिवस हवेची गुणवत्ता खराब झाल्याचे दिसून आले. आता २०२३च्या जानेवारीतही ३१ पैकी ३१ दिवस हवा खराब असल्याचे दिसून आले.
सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार महिन्याचे १५ दिवस शहर साधारण प्रदूषणाच्या गटात म्हणजे वायू गुणवत्ता निर्देशांत ५० ते १०० एक्युआयच्या गटात हाेता. यातील केवळ दाेन दिवस हवेची गुणवत्ता समाधानकारक हाेती. याशिवाय १३ दिवसांत हवेचा एक्युआय १०१ ते २०० च्यादरम्यान हाेता, जाे अधिक प्रदूषणाच्या श्रेणीत येताे. ३ दिवस हा स्तर ३०० एक्युआयच्या म्हणजे धाेक्याच्या श्रेणीत गेला. वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, त्वचा राेग, डाेळ्याची जळजळ, एलर्जी यांसारखे आजार वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत नागपूरसाठी कृती आराखडा तयार असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही, असे दिसून येत असल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
वायू गुणवत्ता - निर्देशांक - आरोग्यावर परिणाम
० ते ५० - चांगला - आरोग्यासाठी चांगला
५१ ते १०० - साधारण प्रदूषित - आधीच श्वसनाचे आरोग्यासाठी त्रासदायक
१०१ ते २०० - अधिक प्रदूषित - दमा, श्वसनाचे रोग आणि हृदयरोग्यासाठी धोकादायक
२०१ ते ३०० - अति प्रदूषित - सर्व नागरिकांसाठी धोकादायक असते.
३०१ ते ४०० - धोकादायक -----------