लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांना दीड लाखाचा गंडा घालणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकाश खांडेकर, मंदाबाई प्रकाश खांडेकर आणि प्रवेश प्रकाश खांडेकर अशी आरोपींची नावे आहेत. ते कस्तुरबानगर, दयानंद पार्कजवळ राहतात.गीतांजली टॉकीजजवळ राहणारा रितेश राधेश्याम शाहू (वय २१) सीताबर्डीच्या एका मोबाईल शॉपीत काम करतो. रितेशसोबत आरोपी प्रकाश खांडेकरची फेब्रुवारी २०१७ मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी प्रकाश खांडेकरने त्याला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. दोन जागा खाली आहे, असे खांडेकर त्यावेळी म्हणाला होता. त्यामुळे रितेशने त्याचा मित्र गोकुळ प्रजापती यालाही ते सांगितले. नंतर या दोघांनी आरोपी खांडेकरने सांगितलेल्या बँक खात्यात थोडे थोडे करून १ लाख ४१ हजार रुपये जमा केले. बदल्यात आरोपीने या दोघांना रेल्वेत नियुक्ती झाल्याचे बनावट पत्र दिले. हे पत्र घेऊन सप्टेंबर २०१७ मध्ये रितेश आणि गोकुळ रेल्वे अधिकाऱ्यांकडे पोहचले असता ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर रितेश आणि गोकुळने आपली रक्कम परत मागितली. ती देण्यासाठी आरोपींनी टाळाटाळ केली. त्यामुळे आॅक्टोबर २०१७ ला रितेश अणि गोकुळने गणेशपेठ ठाण्यात तक्रार अर्ज दिला. हवालदार रणजित जाधव यांनी या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केली. रेल्वेतील अधिकारी, बँक अधिकाऱ्यांकडून कागदोपत्री अहवाल तयार मागितल्यानंतर शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.मेडिकलसाठी मुंबईला बोलविलेआरोपींनी रितेश आणि गोकुळला मेडिकलच्या नावाखाली मुंबईला बोलविले होते. तेथेही त्यांच्याकडून आठ हजार रुपये घेतले. त्यांनी ही फसवणूक अशी काही केली की नियुक्तीचे पत्र घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांकडे जाईपर्यंत या दोघांना संशयच आला नव्हता. आरोपींची एकूणच पद्धत बघता त्यांनी अशाच प्रकारे आणखी काही जणांची फसवणूक केली असावी, असा पोलिसांना संशय वाटतो.